सांगोला : सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत शिवसेना उमेदवार शहाजीबापू पाटील हे आघाडीवरच होते़ मात्र २१ व्या फेरीत शेकापच्या कार्यकर्त्यांनी शेकापचे उमेदवार डॉ़ अनिकेत देशमुख हे ९६ मतांनी विजयी झाल्याचे सांगितले़ अधिकृत घोषणा जाहीर झालेली नसताना हे सांगितल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला तर शहाजीबापू पाटील हे ७९४ मतांनी आघाडी मिळाल्याने तेच विजयी झाले म्हणून त्यांच्याही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.
सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला आहे़ यावेळी आ़ गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे निवडणूक रिंगणात होते. शिवसेनेकडून अॅड़ शहाजीबापू पाटील निवडणूक रिंगणात होते़ या विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने दुरंगी लढत झाली.
गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत अॅड. शहाजीबापू पाटील यांनी ४७९ मतांची आघाडी घेतली़ ती त्यांनी २१ व्या फेरीपर्यंत कायम ठेवली़ मतांची संख्या कमी-अधिक झाली तरी आघाडी मात्र कायम होती़ २१ व्या फेरीची मतमोजणी सुरू झाली़ त्या फेरीतही शहाजीबापू पाटील यांना १०९६ मतांची आघाडी कायम होती़ दरम्यान, चोपडी येथील बूथ क्रमांक २०५ च्या मशीनमध्ये बिघाड झाल्याने बॅलेट पेपरवर मोजणी केली़ त्या बूथवर डॉ़ अनिकेत देशमुख यांना शहाजीबापू पाटील यांच्यापेक्षा २६ मते जास्त मिळाली.
दरम्यान, शेकापच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख हे ९६ मतांनी विजयी झाल्याचे सांगितले. त्यांच्या या अफवेने मतमोजणी स्थळाच्या बाहेर असलेले तसेच शहर व तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला़ तर दुसरीकडे अॅड़ शहाजीबापू पाटील हे ७९४ मतांनी विजयी झाल्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. मात्र डॉ़ अनिकेत देशमुख यांनी दुबार मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच दोन्ही गटाने गुलाल उधळून जल्लोष केला.