सांगोला : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका जवळपास आठ महिन्यांनंतर होत आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारावर वारेमाप पैशाची उधळपट्टी केली जाते. आता निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याबरोबरच ५० हजारापर्यंत खर्च मर्यादेचा फतवा निवडणूक आयोगाकडून निघाला आहे. या नियमावलीच्या चाकोरीतून जात सांगोल्यात विविध राजकीय गटांनी ६१ पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात आणण्यासाठी हालचाली चालवल्या आहेत.
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक तारखा जाहीर झाल्या आहेत. यावरून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीची गणिते घालण्याची प्रक्रिया गटातटातून सुरू झाली आहे. या निवडणुकीवर आजी-माजी लोकप्रतिनिधींसह नेतेमंडळींचे लक्ष्य असणार आहे. त्यानुषंगाने जास्तीत जास्त ग्रामपंचायती स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून गावपातळीवर खलबते सुरू आहेत.
यंदा सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून सदस्यांमधून होणार आहे. ही निवडणूक मर्यादित असली तरी खर्च मात्र मोठ्या प्रमाणात होत असतो हे मागील निवडणुकांवरून दिसून आले आहे.
सांगोला तालुक्यात ६१ ग्रामपंचायती आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांवर प्रचार खर्चावर निर्बंध आणले आहेत. ७ ते ९ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत उमेदवाराला प्रचार कार्यावर केवळ २५ हजार रुपये खर्च करता येणार आहेत. ११ ते १३ ग्रामपंचायत सदस्य संख्या उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा ३५ हजार रुपये, १५ ते १७ ग्रामपंचायत सदस्य संख्या उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा ५० हजार रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.