सोलापूर : कोरोनाचा धसका सर्वच स्तरातील नागरिकांनी घेतला असून, याचा परिणाम सॅनिटायझर आणि मास्कच्या विक्रीवर होत आहे. शहरातील औषध विक्री करणाºया दुकानात (मेडिकल) सॅनिटायझर आऊट ऑफ़ स्टॉक झाले असून, मास्कची विक्री मनमानी दराने होत आहे. पर्याय नसल्याने नागरिकही दुकानदार सांगतील त्या दराने मास्क व सॅनिटायझरची खरेदी करत आहेत. ‘लोकमत’च्या टीमने शहरातील विविध भागातील मेडिकल दुकानांमध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर ही बाब समोर आली.
कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर हॅण्ड सॅनिटायझरच्या मागणीतही वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्जिकल आणि औषध विक्रेत्यांकडून मास्क व हॅण्ड सॅनिटायझरची धडाक्यात विक्री होत आहे. याचा फायदा काही मॅन्युफॅक्चर कंपन्या, पुरवठादार व विक्रेते घेत असल्याचे चित्र भारतभर पाहायला मिळत आहे.
एरव्ही पाच रुपयाला मिळणारा साधा मास्क आता २० रुपयाला मिळत आहे. वॉशेबल मास्क ५० ते ७० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. नागरिकांना मास्कची इतकी गरज वाटत असल्याने ग्राहक औषधाच्या दुकानात आले असता त्यांना स्टॉक नाही. एवढीच किंमत आहे, आम्हालाच परवडत नसताना आम्ही विकत आहोत. फक्त काही रुपयेच आम्हाला मिळत आहेत.
आमच्याच काय इतर कोणत्याही मेडिकलमध्ये जा, तुम्हाला यापेक्षा जास्त किमतीने मास्क विकत मिळतील, असे उत्तर विक्रेत्यांकडून येत आहेत. काही विक्रेत्यांंनी सॅनिटायझरसोबतच मास्कही विक्रीस नसल्याचे सांगितले. विक्री करण्यात येणाºया मास्कवर एमआरपी नसल्याने ग्राहकांना खरी किंमत कळत नाही.
काही औषध विक्रेत्यांचा प्रामाणिकपणा- बहुतांश औषध विक्रेते चढ्या दराने मास्कची विक्री करत असताना काही प्रामाणिक औषध विक्रेते दिसून आले. डिस्पोजल मास्क, वॉशेबल मास्कची विक्र ी २० ते ३० रुपयांपर्यंत करत असल्याचे दिसून आले. मात्र असे औषध विक्रेते संख्येने शहरात कमी आहेत. शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाचा धसका आहे. त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी ते सॅनिटायझर, मास्क वापरत असताना काही औषध विक्रेते मूळ किमतीत वस्तूंची विक्री करताना पाहायला मिळाले. जास्त मास्क हवे असल्यास संध्याकाळपर्यंत मूळ किमतीत विक्री करू, असा शब्द त्यांनी ग्राहकांना दिला.
येथे मिळेल योग्य दरात मास्क आणि सॅनिटायझर- काही औषध विक्री दुकानांमध्ये मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. तसेच चढ्या भावाने त्यांची विक्री होत आहे. मात्र, एम+एम मेडिकल (मेडिसिन अॅण्ड मोअर) स्टोअरमध्ये मास्क आणि सॅनिटायझर मूळ किमतीत देण्यात येत आहे. शहरात एम+एम मेडिकल स्टोअरमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा आहे. या प्रकारचे सुमारे २५ मेडिकल स्टोअर आहेत. येथे एमआरपीप्रमाणे किंवी एमआरपीपेक्षा कमी दराने त्याची विक्री करत असल्याचे सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी सांगितले.
ब्रॅण्डेड सॅनिटायझर झाले गायब- शहरातील बहुतांश मेडिकल दुकानांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले. ज्या मेडिकलमध्ये सॅनिटायझर होते ते ब्रॅण्डेड नव्हते. मात्र त्याची किंमत ही ब्रॅण्डेड कंपनीच्या सॅनिटायझरएवढीच होती. या सॅनिटायझरची विक्री ही एमआरपीप्रमाणे होत असल्याचे दिसून आले. हात धुण्यासाठी वापरला जाणारा हॅण्डवॉश मात्र सर्वच मेडिकलमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. हॅण्डवॉशच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.