करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेस माझ्या कालावधीत ९० कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला. १७ वर्षे रखडलेली ही योजना मी कार्यान्वित करुन दाखविली. यामुळे माझे या योजनेसाठी किती योगदान होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी श्रेयवादासाठी खोटी विधाने करुन अकलेचे तारे तोडू नयेत, असा पलटवार माजी आमदार नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या ३४२ कोटीच्या दुसऱ्या सुप्रमास मंजुरी मिळाल्यानंतर आ. संजय शिंदे यांनी माजी आमदार पाटील यांच्याबाबतीत या प्रकल्पासाठी कसलाही निधी मंजूर करुन आणला नाही असे विधान केले होते. या विधानाचा पाटील यांनी खरपूस समाचार घेतला.
यावेळी नारायण पाटील म्हणाले, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी माझ्या पाच वर्षाच्या कालावधीत पाच अर्थसंकल्पात तसेच एक वेळेस पुरवणी मागणीत सन २०१४-१५ (१६ कोटी ५० लक्ष), सन २०१५-१६ ( ११ कोटी), सन २०१६-१७ ( १७ कोटी), सन २०१७-१८ ( १६ कोटी), सन २०१८-१९ (२० कोटी) आणि सन २०१९-२० (१० कोटी) असा ९० कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. माझ्या पाच वर्षाच्या कालावधीतच भूसंपादनाच्या कामासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन प्रकल्पग्रस्तांना रक्कम सुध्दा देण्यात आली.
अहोरात्र झटून या योजनेची रखडलेली कामे पूर्ण करुन दोन्ही पंपगृहांची चाचणी घेतली. माझ्या कालावधीतच रब्बी, खरीप तसेच उजनी ओव्हर फ्लो या माध्यमातून आवर्तने सुध्दा देण्यात आली. प्रत्यक्ष टेल एन्डला असलेल्या घोटी या गावच्या कार्यक्षेत्रात पाणी पोहोच केले. तेथूनही पुढे वरकुटे हद्दीतील बंधारेही आपण भरुन दिल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
---
आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नका
एखाद्या काम चालू असलेल्या प्रकल्पाची सुप्रमा मंजूर करणे ही बाब काही अवघड नाही, वास्तविक हा पूर्णत: तांत्रिक व कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. लोकप्रतिनिधीचे खरे काम या योजनेसाठी निधी मंजूर करुन घेणे हेच असते. यामुळे गेल्या दोन वर्षात या योजनेसाठी किती निधी मंजूर करुन आणला हे आ. शिंदे यांनी सांगावे. यामुळेच मग आयत्या पीठावर रेघोट्या कोण ओढत आहे हे जनता जाणून आहे. उगीच खोट्या श्रेयवादासाठी विधाने करु नयेत. यामुळे स्वतःच्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर खोटी कागदपत्रे वापरुन काढलेली बोगस कर्ज प्रकरणे दबणार नसल्याचा टोलाही नारायण पाटील यांनी लगावला.
---
फोटो : नारायण पाटील