करमाळा : अजूनही वेळ गेलेली नाही.. उमेदवारी भरण्याअगोदरच विचार करा व आताच रणांगणातून माघार घ्या, असा सल्ला संजय शिंदे यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. करमाळा येथे आयोजित माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील निवडणूक प्रचार शुभारंभाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना व मित्रपक्षांचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा, माढा, टेंभुर्णी आणि पंढरपूर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.नारायण पाटील, माजी खा.रणजितसिंह मोहिते-पाटील, उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बार्शीचे माजी आ.राजेंद्र राऊत, आ. प्रशांत परिचारक, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी,पंचायत समिती सभापती शेखर गाडे उपस्थित होते.
आमच्याबरोबर राहून ज्यांनी गद्दारी केली त्या उमेदवारास धडा शिकवावा, असे चंद्रकांतदादा यांनी सांगितले. अजूनही वेळ गेलेली नाही उमेदवारीचा फॉर्म भरण्याअगोदरच शहाणे व्हा..असे ते म्हणाले. करमाळ्यातील कमलाई कारखान्यामध्ये ज्या शेतकºयांची परस्पर कर्ज काढून फसवणूक झालेली आहे, त्या शेतकºयांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे,विठ्ठल भणगे,सदाभाऊ खोत,रणजितसिंह नाईक-निंबाळकर,आ.नारायण पाटील यांची भाषणे झाली.
संजय शिंदे यांची चौकशी करून शासन देऊ
- - संजयमामा शिंदे यांच्याबद्दल फार काही बोलणार नाही. त्यांच्या ज्या चुका झाल्या आहेत, त्या चुकांबद्दल शासन तर व्हायलाच पाहिजे. त्यांच्याविषयी खूप काही तक्रारी आहेत. त्याची चौकशी करून शासन दिले जाईल, असा धमकीवजा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
- - सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात प्रचंड कटुता होती. त्यामुळे हा जिल्हा विकासापासून दूर होता, परंतु काही नवीन पिढीतील तरुणांनी एकत्र येऊन कारभार हाती घेतला़ त्यांना आम्ही सहकार्य केले़ त्यांची मैत्री आता जिल्ह्यात सर्वश्रुत आहे़ लोकसभेच्या निमित्ताने सर्व मित्र एकत्र आहेत, पण संजयमामा बाहेर गेले़ त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही़ दोन दिवस शिल्लक आहेत़ त्यांनीच तयार केलेली मैत्री निभावावी, अशी भावनिक साद चंद्रकांत पाटील यांनी घातली.
बागलांच्या रक्तातच गद्दारीसंजयमामा, रश्मीदीदी दोघे स्वार्थ व सत्तेसाठी एकत्र आलेले असून, त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. बागल गटाचा जन्मच गद्दारीतून झालेला आहे.जयवंतराव जगतापांनी स्व.दिगंबर बागल यांना पंचायत समितीचे सभापती केले, त्या जगतापांनाच धोका देण्याचे काम बागलांनी केले आणि बाहेर प्रचारात ते सांगत फिरतात की बागल गटाच्या रक्तात गद्दारी नाही, असे आ.नारायण पाटील यांनी सांगितले.
मैत्री वेगळी अन् राजकारण वेगळे : प्रशांत परिचारक- संजयमामा माझे चांगले मित्र आहेत, पण राजकारणात मैत्री केली तर ती टिकवावी लागते़ मात्र संजयमामा यांनी ती टिकवली नाही़ त्यामुळे आता त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही़ आम्ही सर्व मित्रांनी जो निर्णय घेतला, त्याला अनुसरुनच वागणार आहे, हा पंतांचा सल्ला होता़ तो मी मानणार आहे, असे आ़ प्रशांत परिचारक यांनी सांगितले.