नासीर कबीर
करमाळा : झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांनी नाही नाही म्हणत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची माळ गळ्यात घालून घेतली. यामुळे येत्या करमाळा विधानसभा मतदारसंघात रश्मी बागल यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये संजय शिंदे भाजपा पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विधानसभा निवडणुकीत उभे राहिले होते. त्यांचा अवघ्या पावणेदोन हजार मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी पुढे आपली राजकीय कर्मभूमी करमाळा मानून गेल्या साडेचार वर्षांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यामातून विधानसभा लक्ष्य समजून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन करमाळा तालुक्यात शिंदे नावाचा चौथ्या गटाचा सवतासुभा निर्माण केला.
मी करमाळा विधानसभा निवडणूकच लढवणार असे म्हणणारे संजय शिंदे यांनी भाजपा, राष्ट्रवादी असे होय... नाही़़ म्हणत मोहिते- पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी पटकावली आहे.