आप्पासाहेब पाटील, सोलापूर: टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी, वाट ती चालावी पंढरीची या संत वचनानुसार टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने हरिनामाचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता. हाच आनंदी सोहळा हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला.
आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. याचवेळी धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले.
धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री विखे-पाटील यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, आ. जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप
सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी , सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खीलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.