: राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या पी. एम. किसान योजनेत क्षेत्रीय पातळीवरील काम ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांनी आतापर्यंत समान प्रमाणात केलेले आहे. राज्यातील ग्रामसेवक संवर्गाची संख्या लक्षात घेता हे काम सर्वात जास्त ग्रामसेवकांनीच केले. असे असताना महसूल व कृषी विभागाकडून ग्रामविकास विभागाला सापत्न वागणूक मिळाल्याची भावना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
पी. एम. किसान योजनेत राज्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते राज्याचे कृषिमंत्री, सचिव यांनाच सन्मानित केले. ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास विभागाचे सचिव यांना साधे बोलावलेही नाही. ग्रामसेवक संवर्गाचा साधा उल्लेखही संपूर्ण कार्यक्रमात केला नाही. येथून पुढे राज्यातील व जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गावर इतर विभागाने लादलेली कामे आम्ही करणार नाही. उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका देखील लवकरच दाखल करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
याबाबत जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या बहुतांशी योजनांमध्ये ग्रामसेवकांची नियुक्ती वारंवार केली जाते. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून चर्चा करण्यात येणार आहे.
०३ तात्यासाहेब पाटील