टेंभुर्णी : पुणे येथून टमटमने गावाकडे निघालेल्या बहीण-भावास रात्रीच्या वेळी सहा दरोडेखोरांनी अडवले. त्यांच्याकडून रोख १२ हजार रुपये आणि २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीपासून आठ किलोमीटर अंतरावरील सापटणे पाटीजवळ ही घटना घडली.
टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सचिन सुभाष बागडे (वय ३०) व त्याची बहीण राधाबाई आबा सूळ (वय ३६, रा. खराबवाडी, चाकण) हे दोघे एका टमटम (एम. एच. १४ डी. एम. ७७१) मधून मोहोळ तालुक्यातील नरखेड या मूळ गावी निघाले होते. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास इंदापूरजवळ त्यांनी जेवण केले. तेथून ते पुढील प्रवासाला निघाले. टेंभुर्णीपासून ८ किमी अंतरावर सापटणे पाटीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. टमटममधून ते खाली उतरताच रस्त्याच्या कडेला डाळिंबाच्या शेतात लपून बसलेले २५ ते ३० वयोगटातील सहा अज्ञात चोरटे बाहेर आले आणि लूटमार केली.
--
दागिन्यांसह २ लाख ६७ हजारांचा ऐवज पळविला
प्रारंभी चोरट्याने टमटमचालक सचिन सुभाष बागडे यांच्याजवळील २ हजार रुपये रोख व त्याच्याजवळील १२ हजारांची सोन्याची बाळी काढून घेतली. तसेच त्याची बहीण राधाबाई हिच्या कानातील १ लाख २० हजार रुपये किमतीची तीन तोळे सोन्याची कर्णफुले, ५६ हजारांचे सोन्याचे गंठण, २५ हजारांची सोन्याची बोरमाळ, ३५ हजारांची सोन्याची अंगठी, मणी-मंगळसूत्र, कानातील कुड्या आणि रोख १० हजार रुपये दमदाटी व मारहाण करून काढून घेतले. या घटनेत बहीण राधाबाई सुळ ही जखमी झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.