मारुती वाघमोडनिंब : वैद्यकीय क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कोल्हे दाम्पत्याने उजाड माळरानावर द्राक्षबाग फुलवली आहे़ मशागत, कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने लागवड आणि सलग ७५ दिवस फवारण्या करून अवघ्या दीड एकरावर १३ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे एका डॉक्टर दाम्पत्याने.
डॉक्टर प्रशांत कोल्हे व डॉक्टर निशिगंधा कोल्हे या दाम्पत्याने रोपळे (ता़ पंढरपूर) येथील स्वत:च्या शेतात ही किमया साधली आहे़ उजाड माळरानावरील या शेतीमध्ये कुसळही उगवत नव्हते, अशा ठिकाणी चार एकरावर मशागत करून जमिनीचे सपाटीकरण करून घेतले़ ती सुपीक बनवली़ आता माळरानावर पाणी आणायचं कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला़ अशाप्रसंगी अडीच किलोमीटर अंतरावर असणाºया कॅनॉलवरून पाईपलाईन करून पाणी खेचून आणले़ आणलेले पाणी साठवायचे कुठे, असाही प्रश्न त्यांच्यापुढे होता़ त्यासाठी ५० लाख लिटर साठवण क्षमता असणारे एक शेततळे उभारले़ या कॅनॉलमधून ज्यावेळी पाणी सुटले त्यावेळी हे शेततळे भरून घेतले़ त्यानंतर दीड एकरावर द्राक्षाच्या लागवडीचा निर्णय घेतला.
या दीड एकरात शेणखत वापरले व त्यानंतर १० बाय ५ अंतरावर खड्डे घेऊन रुस्टॉक लावले़ त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत रोपांची काडी, डोळे भरणे ही कामे करून घेतली़ जानेवारी महिन्यात एस़ एस़ एऩ या वाणाचे डोळे भरले़ त्यानंतर प्रत्येक वेलीजवळ एक बांबू आधारासाठी लावला़ त्याची वाढ होऊ लागताच लोखंडी वाय आकाराचे फाउंडेशन उभारले़ वाय आणि एच आकाराची काडी तयार करण्यात आली़ फलधारणा झाली आणि आॅक्टोबरमध्ये छाटणी करण्यात आली़ फलधारणेसाठी फवारणी करण्यात आली़ बहार धरण्यात आल्यानंतर कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने सलग ७५ दिवस फवारण्या करून वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव रोखला.
दररोज २० लिटर पाणी - दीड एकर क्षेत्रावर प्रत्येक रोपाला ठिबकद्वारे दररोज २० लिटर पाणीपुरवठा केला़ साडेतीन महिन्यांनंतर द्राक्ष जागेवर येऊन स्थानिक व्यापाºयांनी खरेदी केली़ तो काढला जात आहे़यंदा ५० रुपये किलो दर मिळण्याची अपेक्षा आहे़ यातून २६ टन उत्पादन मिळेल़ १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे़
शेतीकडे आम्ही एक छंद म्हणून पाहिलो़ मागील दोन वर्षांत यामधून लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे़ पहिल्या वर्षी लागवड आणि फाउंडेशनसाठी केलेला खर्च निघाला़ शेती हा व्यवसाय म्हणून जर पाहिले तर यामधूनही मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात़ सध्या स्पर्धेचे युग असून, शेतकरी चांगल्या प्रतीची द्राक्षं बाजारात आणली तरच पैसे मिळतील़- डॉ़ प्रशांत कोल्हे, द्राक्ष उत्पादक, रोपळे