सांगोला : शासनाकडून सरपंच, उपसरपंचांना मानधन तर सदस्यांना केवळ बैठक भत्ता दिला जातो. त्यानुसार सांगोला तालुक्यात आता नव्याने निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंच अशा ११५ जणांना प्रतिमहा शासनाकडून लोकसंख्येच्या तुलनेत मानधन दिले जाणार आहे. उर्वरित निवडून आलेल्या ५३७ सदस्यांना २०० ते ३०० रुपयांचा बैठक भत्ता अन् चहापानावर समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान सरपंच व उपसरपंचांना शासनाकडून ७५ टक्के व ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी मधून २५ टक्के मानधन दिले जाते.
गावचा विकास करणारी संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. सदस्य म्हणून निवडून जाणाऱ्यांवर प्रभागाचा विकास करण्याची जबाबदारी असते. त्यानुसार गावाचा विकास करण्यासाठी सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सदस्यही प्रयत्न करतात. मात्र ग्रामपंचायतीमधील सरपंच व उपसरपंच यांनाच शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र सदस्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष केल्यामुळे या सदस्यांना सर्वकाही आपल्या स्वखर्चातून करावे लागते.
सांगोला तालुक्यात ७६ ग्रामपंचायती असून यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतीसाठी जानेवारी निवडणूक घेण्यात आली. सरपंच, उपसरपंच निवडणुकीत सरपंच, पदासाठी निजामपूर, खिलारवाडी, हणमंतगाव, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी भोपसेवाडी या सात ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणानुसार उमेदवार नाहीत. ६१ पैकी ५४ ग्रामपंचायतीवर सरपंच विराजमान झाले आहेत. दरम्यान ६१ ग्रामपंचायतीत ११५ सदस्यांची सरपंच व उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. यात ५४ सरपंच, ६१ उपसरपंच यांचा समावेश आहे. शासनाकडून सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन मिळते. मात्र निवडून आलेल्या ५३७ सदस्यांना केवळ बैठक भत्ता आणि बैठकीत मिळणाऱ्या चहापानावर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे शासनाकडून मानधन देण्याची मागणी नूतन सदस्यांनी केली आहे.
----
लोकसंख्या निहाय मिळणारे मानधन
० ते २ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ३ हजार तर उपसरपंचास १००० रुपये, २००१ ते ८ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ४ हजार रुपये तर उपसरपंचाला १५०० रुपये, ८ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ५ हजार रुपये आणि उपसरपंचाला २ हजार रुपये मानधन देण्यात येते. तर सदस्याला २०० ते ३०० रुपये बैठक भत्त्यासह चहापानावर समाधान मानावे लागते.