चालूवर्षी सांगोला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी लावली. टप्प्याटप्प्याने पडलेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी सुमारे १६ हजार ६०९ हेक्टर बाजरी, ६ हजार ८४९ हेक्टर मका, १ हजार ९३० हेक्टर सूर्यफूल, ८६४ हेक्टर तूर, ५९३ हेक्टर उडीद व ३९९ हेक्टर भुईमूग आदी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. पेरणीनंतर सततच्या पावसामुळे खरीप पिके जोमात उगवल्याने शेतकरी आनंदित झाला होता. रब्बी हंगामापूर्वी शेतकरी खरीप बाजरी काढणी-मळणीच्या कामात व्यस्त आहे.
दुसरीकडे मशागत केलेल्या शेतात शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पेरणीसाठी चाढ्यावर मूठ धरली आहे. साधारण शेतकऱ्यांनी ४०० एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी उरकली, तर वाफशाच्या ठिकाणी शेतकरी ज्वारी पेरणीत व्यस्त आहे.
ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
दरवर्षी शेतकरी बैलपोळा सणानंतर रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात करतो. या काळात पडणारा पाऊस व शेतातील वाफसा यांचा अंदाज घेऊन शेतकरी नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत रब्बी ज्वारी पेरण्या उरकून घेतात. सध्या तालुक्यात रब्बी ज्वारी पेरणीच्या तोंडावर सर्वदूर चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही रब्बी ज्वारीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात होतील. कदाचित पावसाचा जोर असाच राहिल्यास रब्बी ज्वारीचे क्षेत्रही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट ::::::::::::
सांगोला तालुक्यात यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने रब्बी ज्वारीला वातावरण पोषक आहे. तालुक्यात रब्बीच्या सुमारे ४५ हजार ४६० हेक्टर क्षेत्रापैकी ज्वारी ३९ हजार ३२१ हेक्टर, गहू ६५९ हेक्टर, मका ५२२८ हेक्टर, इतर तृणधान्य २२२ हेक्टर क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी बैलपोळा सणानंतर रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात केली आहे.
- शिवाजी शिंदे
तालुका कृषी अधिकारी
फोटो ओळ ::::::::::::::::::::
खरीप बाजरी काढणी व मळणीच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी, तर दुसरीकडे शेतकरी रब्बी ज्वारीची पेरणी करतानाचे छायाचित्र.