सोलापूर : सोलापुरातील नामवंत शाळेत घालण्यात येणारी सत्यनारायण पूजा शिक्षणाधिकाºयांनी पत्रक काढून थांबवली़याचबरोबर सोलापुरातील कोणत्याही शाळेत धार्मिक कार्यक्रम घेऊ नयेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ऐन श्रावणामध्ये काढण्यात आलेल्या या पत्रामुळे काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे़ याबाबतचे पत्रक शिक्षणाधिकाºयांनी काढले आहे.
सोलापुरातील कै. सखाराम सुरवसे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुरवसे हायस्कूल, होटगी रोड या शाळेत गुरुवारी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत विविध जाती-धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात यामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, तसेच आधुनिक युगात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम याद्वारे होऊ शकते. यामुळे शाळेतील आयोजित सत्यनारायण पूजा रद्द करावी व संबंधित शाळेवर कारवाई करावी, अशी तक्रार गणेश मोरे यांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली होती.
यावर कारवाई करत शिक्षणाधिकाºयांनी बुधवारी पत्रक काढून शाळेवर कारवाईचे आदेश दिले़ त्यांनी काढलेल्या पत्रकात संबंधित शाळेने गुरुवारी शाळेत सत्यनारायण पूजा घालू नये़ याचबरोबर जिल्ह्यातील एकाही शाळेत धार्मिक कार्यक्रम घेऊ नयेत, विज्ञान युगात अशा कार्यक्रमांचे आयोजन करून अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये़ या पत्रकाला डावलून जर सत्यनारायणाची पूजा घातल्यास शाळेवर व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, असे पत्रकच शिक्षणाधिकाºयांनी काढले आहे़
संबंधित शाळेमध्ये गुरुवारी सत्यनारायणाची पूजा घालण्यात येणार आहे़ शाळेत अशा प्रकारची पूजा घालून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते़ यामुळे या शाळेवर कारवाई करावी, अशी तक्रार माझ्याकडे आली होती़ यावरून संबंधित पत्र काढले आहे़ हे पत्रक जिल्ह्यातील १०२९ शाळांना देण्यात आले आहे़- सुनील शिखरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद, सोलापूर