कोल्हापूर : रंकाळा माझा श्वास आहे आणि तो जपणे हे माझे कर्तव्यच आहे, अशा भावनेतून जमलेल्या हजारो रंकाळाप्रेमींनी आज गुरुवारी सकाळी मूठ आवळली आणि रंकाळा वाचविण्यासाठी कटिबध्द असल्याची शपथच घेतली. ‘वाचवू रे वाचवू..रंकाळा वाचवू..मी रंकाळा..मी रंकाळा..भोगतो आहे मरणकळा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. रंकाळा तलावाची अवस्था दयनीय बनली आहे. तटबंदीची पडझड, पाण्याला सुटलेली दुर्गंधी, हिरवा तवंग, वाढते प्रदूषण यामुळे तलाव मरणासन्न अवस्थेत आहे. रंकाळा तलाव संवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला; पण तलावाचे दुखणे काही थांबलेले नाही. प्रशासनाची निष्क्रियता, लोकप्रतिनिधींची अनास्था आणि तलावाचे सौंदर्य टिकविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचा अभाव यामुळे रंकाळ्याला मरणकळा आली आहे. त्यामुळे आज, गुरुवारी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीने ‘रंकाळा बचाव’साठी परिक्रमा घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास सर्वच स्तरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सकाळी पावणेसात वाजता रंकाळा चौपाटी येथील नवनाथ मंदिराजवळ एकत्र येऊन मुक्त व्यासपीठावर रंकाळ्याविषयी कविता, प्रदूषणमुक्तीबाबत उपाय, सूचना, तसेच तलावाबाबतच्या आठवणी व घटना, आदींचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कथन केले. जमलेल्या हजारो नागरिकांनी काळ्या फिती लावून नवनाथ मंदिर, रंकाळा चौपाटी-संध्यामठ-इराणी खण-खणेश्वर- पदपथ उद्यान अशी रंकाळा तलावाभोवती परिक्रमा पूर्ण केली. या परिक्रमेत शाळा व सर्वसामान्य नागरिक ते विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या रंकाळाप्रेमींनी या मोहिमेत रंकाळ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहभाग घेतला. सकाळी बोचरी थंडी होती तरीही लोक रंकाळा वाचलाच पाहिजे, या भावनेपोटी मोठ्या संख्येने परिक्रमेसाठी आले.या परिक्रमेत मराठा सेवा संघ, जावळाचा बालगणेश तरुण मंडळ, ठाणे गल्ली तरुण मंडळ, जुना बुधवार, फुलेवाडी सोशल फौंडेशन, रोटरी क्लब, रंकाळा चौपाटी फेरीवाले संघटना, शहाजी कॉलेज, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, आदर्श प्रशाला, यशवंतराव पाटील हायस्कूल, टाऊन हॉल मार्निंग वॉकर्स, चंबुखडी निसर्ग मित्रमंडळ, आदी संस्था, संघटनाही सहभागी झाल्या होत्या. याचबरोबर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘सकाळ’चे समूह संपादक श्रीराम पवार, सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, भैया कदम, प्रमोद सरनाईक, राजू मेवेकरी, अशोकराव साळोखे, चंद्रकांत यादव, शिवाजी जाधव, बी. एल. बरगे, माजी नगरसेवक अजित राऊत, चंद्रकांत वडगावकर, दिलीप देसाई, सुभाष हराळे, रमेश वडणगेकर उपस्थित होते. या परिक्रमेचे आयोजन अॅड. अजित चव्हाण, विकास जाधव, राजेंद्र पाटील, सागर नालंग, आदींनी केले. मी शपथ घेतो की...रंकाळा तलाव वाचविण्यासाठी संवर्धन समितीचे संयोजक ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी ‘मी शपथ घेतो की, रंकाळा आमचा श्वास आहे. तो आमचा ध्यास आहे आणि तो वाचविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,’ अशी शपथ सर्व उपस्थितांना दिली. काळ्या फितीविविध शाळांमधील बालचमूंनी सहभाग घेत, रंकाळा वाचविण्याच्या घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आणलेली बॅनर लक्षवेधी होते. यशवंतराव पाटील हायस्कूल (कसबा बावडा) च्या विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून रंकाळा तलावाभोवती सायकल फेरी काढत परिक्रमेला साथ दिली.
‘वाचवू रे वाचवू..रंकाळा वाचवू..भोगतो आहे मरणकळा
By admin | Published: December 25, 2014 11:03 PM