सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघात विजयी ठरलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांसाठी सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची एकजूट निर्णायक ठरली. पदवीधर आपलेच असा आत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांना मतदारांनी चांगलाच धक्का दिला. दरम्यान, दत्तात्रय सावंत अन् जितेंद्र पवारांना फाजील आत्मविश्वास घातक ठरला.
शिक्षक मतदारसंघात भाजपने सोलापुरातीलच जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. पवार हे निवडणूक रिंगणात दुसऱ्यांदा होते. त्यांना वर्षभरापूर्वीच ‘तयारीला लागा’, असा स्पष्ट संदेशही देण्यात आला होता. त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंत्रणा लावली. मतदारसंघात त्यांनी स्वत: दौरे केले. पण मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपची यंत्रणा कमी पडल्याचे दिसून आले. या मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर व विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांच्यातच लढत झाल्याचे दिसून येत आहे. सावंत यांनाही या वेळेस फटका बसला. त्यांची भिस्त रयत संस्थेच्या मतदारांवर होती.‘एक नंबरला मीच अन् दोन नंबरलाही मीच’, ही त्यांची आकलनापलीकडची कल्पना शेवटी अचाटच ठरली. केवळ पुरस्कार वाटून आमदार होता येत नसतं, हाही संदेश शिक्षकांनी दिला. महाविकास आघाडीमुळे मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम यांच्या शिक्षण संस्थांचेही पाठबळ गेले. शिक्षक कृती समिती मतांतरामुळेही परिणाम झाला.
पदवीधर मतदारसंघात चार वेळा भाजपचे वर्चस्व होते. गेल्या वेळेस भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सारंग पाटील, अरुण लाड यांच्यात लढत झाली. लाड यांची बंडखोरी पाटील यांच्या पथ्यावर पडली. या निवडणुकीतच भाजपला धोक्याचा इशारा होता. किंगमेकर म्हणून असलेले चंद्रकांत पाटील यांनाही हा आत्मविश्वास घातकी ठरल्याचे दिसून येत आहे. या वेळेस लाड यांनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली तरी महाविकास आघाडीच्या एकजुटीचा त्यांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार, सतेज पाटील यांनी प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यात दौरे केले. याचा चांगला परिणाम झाल्याचे मतदानावरून दिसून आले.
कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा.. शिंदेंचे व्याहीप्रेम!
अरुण लाड यांच्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात मोठी यंत्रणा लावली. तीन दिवस ते सोलापूर शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामास होते. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व एमआयएमच्या नेत्यांना त्यांनी एकाच व्यासपीठावर आणले. सर्व शिक्षण संस्थांमधील प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. आमदार शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांची मुलगी अरुण लाड यांची सून आहे. एकीकडे काही स्थानिक नेत्यांच्या रुसवाफुगवीत महाआघाडी अडकलेली असताना आमदार शिंदे यांनी लावलेली शिस्तबद्ध यंत्रणा स्ट्राँग ठरली. ‘पक्षनिष्ठे’पेक्षाही ‘व्याहीप्रेम’'''''''' अधिक फायद्याचे ठरले.