बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : भाजपच्या चार माजी नगरसेविकांनी शनिवारी सकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत बीआरएस मध्ये प्रवेश करण्यासाठी हैदराबादकडे रवाना झाले. साठ गाड्यांसह तीनशेहून अधिक समर्थकांचा ताफा घेऊन भाजपचे नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण, जूगनबाई आंबेवाले तसेच जयंत होले पाटील यांच्यासह पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आदी दुपारी हैदराबादला पोहोचले. सायंकाळी पाच दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. जय तेलंगणा..जय तेलंगणा..अशा घोषणा देत सर्वांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला.
माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्याळ यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सोडत असल्याने दू:ख होत असल्याची भावना व्यक्त केली. भाजपच्या नेतृत्वावर तसेच शहरातील दोन्ही आमदारांवर नाराजी व्यक्त करत केसीआर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सोशल मिडियावर जाहीर केले. वल्याळ यांच्यासह दशरथ गोप, उद्योजक जयंत होले पाटील, अशोक चिलका, दत्तात्रय गुंडेली, भास्कर मार्गाल, दिनेश यन्नम, श्रीनिवास गड्डम, सुमीत जोशी, दत्तात्रय यन्नम, मल्लिकार्जुन सरगम यांच्यासह अनेकांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला.