सोलापूर/बार्शी : शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत महिना 5 ते 25 टक्के रिटर्न्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत, कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन, जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा विशालका कन्सल्टींग सर्व्हीसेसचा संचालक विशाल फटे हा सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता ते 7.00 या दरम्यान थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक केली असून आज त्यास बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बार्शीसह जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा विशाल फटे याच्याविरोधात चौथ्या दिवशी ५ जणांनी २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. बार्शी पोलिसात आजपर्यंत ८१ तक्रारांकडून १८ कोटी ७८ लाख १७ हजारांची फसवणूक झाल्याची नोंद केली आहे. विशाल फटे याने तीन वित्तीय संस्था स्थापन करून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक झाली आहे.
याप्रकरणी प्रमुख असलेला विशाल फटे (रा .उपळाई रोड) याने गुंतवणूकदारांना पैशाचे आमिष दाखवून गुंतवणूक करणाऱ्यांना प्रथम व्याजासह रक्कम देऊन विश्वासार्हता निर्माण केली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा वाढताच तो बार्शीतून पसार झाला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध १४ जानेवारी रोजी पोलिसात तक्रारी अर्ज दिल्याने पहिल्याच दिवशी ५ जणांनी तक्रारी अर्ज दिल्याने ५ कोटी ६३ लाखांचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. तर दुसऱ्या दिवशी तक्रारी अर्जात त्यात वाढ होऊन ११ कोटी ७ लाख ३५ हजार रुपयांची झाली होती. आजपर्यंत ८१ जणांनी १८ कोटी ७८ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याबाबत अर्ज दाखल झाले आहेत.