विलास जळकोटकर
(विविध पक्षांच्या गल्लीबोळातून पदयात्रा सुरू आहेत. विजयाचे नारे.. मतदानाचे आवाहन.. लाऊडस्पीकरचा कर्णकर्कश गोंगाट सुरू आहे. शहरातील पदयात्रेतला एक संवाद)
- सिद्धू: नमस्काररीऽऽ अण्णा
- अण्णा: येन माडती, अप्पी... यल्ली व्हन्टी (कुठं निघाला)
- सिद्ध: त्येच की, आपल्या साह्यबाच्या प्रचाराला निगालाव. लक्ष असू द्या अण्णा आपल्याकडं. (बरं म्हणत अण्णा रस्ता ओलांडतात.. शेजारचा आंदू सिद्धूला विचारतो)
- आंदू: कोणाय बे !
- सिद्धू: कोण का असंना बे, नमस्काररी म्हणायचं. ‘अबे, नमदू अप्पंदू येनू व्हंटाद’ (आपल्या काय बापाचं चाललंय.) या इलेक्शनमध्ये मिळतंय त्याच्याकडून घ्यायचं. आता आमी बग. आमच्या मंडळाचे ४० कार्यकर्ते हायती. कुणाच्या सभेला, पदयात्रेत सामील व्हायचं झालं तर पैले व्येव्हार ठरवितो, मगच सामील.
- आंदू: मस्ताय की बे, तुजं प्लॅनिंग.
- सिद्धू: आपुन का साधा मानूस हाय काय. आता ह्येच बग. आता सामील झालेल्या पदयात्रेतबी आपली २० माणसं हायेत. थोडं अडव्हान्स दिलंय. बाकीचं ह्येवढी पदयात्रा संपली की मिळणार. कायबी म्हण. सध्या आपलं बिझी शेड्यूल चाललंय. पिच्चेरमधल्या नटासारखं.
- आंदू: म्हणजी.
- सिद्धू: ह्यबक, सकाळी ‘हात’ दाखवित जय हो, दुपारी ‘कमळ’ फुलवत हम तुम्हारे साथ है. जमलंच तर रात्री अजून कुठंबी. आपल्याला काय पैसा मिळंल तिकडं जय हो.
- आंदू: म्हंजी, सिद्ध्या मज्जा हाय की बे, तुजी.
- सिद्धू: आता ह्यबक. त्या पक्षाच्या एका पुढाºयाशी आपला व्येव्हार ठरलाय. त्यो ‘रोकडा’ कमी द्यायची भाषा कराय लागलाय. आता बग त्याला कसा ‘हात’ दाखवितो.
- आंदू: म्हंजी काय करणार बे.
- सिद्ध: काय करणार? प्रचारातून आपली मानसं काढून घेणार. मग बग कसं वटणीवर येत्यात त्ये. एवडी निवडणुकीपुरतीच संधी असत्याय. पुन्हा आपल्याला कोण खातंय.
- आंदू: म्हनजी त्या उमेदवारी दाखल करायच्या येळी कार्यकर्त्याचं ‘कमळ’ लई फुललं व्हतं.
- सिद्धू: अबे. तितं बी आपले कार्यकर्ते व्हतेच की. जाम रोकडा मिळाला तितं.
- आंदू: आयला, मस्ताय की, बिनभांडवली धंदा.
- (एव्हाना पदयात्रा निम्मा वॉर्ड फिरुन झालेली असताना प्रचारप्रमुख पुढाºयाची आणि पदयात्रेतल्या भाडोत्री कार्यकर्त्याची आणि त्याची हुज्जत सुरू होते.)
- सिद्ध: (त्या कार्यकर्त्याकडं पाहून) येनबे मल्ल्या?
- कार्यकर्ता: ठरलेला रोकडा द्याला काकं करायला लागलंय.
- सिद्धू: (प्रचारप्रमुख पुढाºयाकडं पाहत) येनरी आप्पा... असं का करालाव. आपलं काय ठरलं व्हतं तसं देताव का काढू समदे कार्यकर्ते प्रचार फेरीतून.
- प्रचारप्रमुख: बाकीचे पुढच्या प्रचार फेरीत देतो म्हणलं की.
- सिद्धू: आप्पा पैलंच तुमाला सांगितलंय सारा व्येव्हार रोख पाहिजे. (दोघांमध्ये चर्चा होते अन् व्यवहार मिटतो. तो कसा ते त्यांनाच माहीत.)