सांगोला तालुक्यातील ३५ गावे कोरोनामुक्त झाल्याने ११ खासगी अनुदानित व २ खासगी विनाअनुदानित अशा १३ ठिकाणी शासन स्तरावरून १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे तब्बल एक वर्षानंतर या १३ ठिकाणी शाळेची घंटा वाजणार असल्याने शासन जीआरनुसार वर्ग खोल्या, शाळा परिसर स्वच्छता, साफसफाई करण्यात आली. मात्र, गुरुवारी शाळा सुरू होण्यापूर्वी १३ गावांपैकी ७ गावांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने येथील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
डोंगरगाव येथील महात्मा फुले विद्यालय, भोपसेवाडी येथील भोपसेवाडी विद्यालय, वाणीचिंचाळे येथील प्रगती विद्यालय, किडेबिसरी येथील महात्मा फुले विद्यालय, डिकसळ येथील माध्यमिक आश्रम शाळा व नराळे विद्यालय अशा ६ ठिकाणी ठराव करून माध्यमिक शाळेच्या घंटा वाजल्या. मात्र, आलेगाव येथील अशोकराव देसाई विद्यालय, हलदहिवडी येथील हलदहिवडी विद्यालय, हंगिरगे येथील कै. आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील विद्यालय, मांजरी हायस्कूल मांजरी, उदनवाडी येथील दा. ग. विद्यालय, जुजारपूर येथील आदर्श विद्यामंदिर व लक्ष्मीनगर येथील लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालय या सात गावात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गावातील शाळा चालू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.