मंगळवेढा:- मंगळवेढा नगरपालिका कन्या शाळा नंबर १ या शाळेची दुमजली इमारत कोसळली सुदैवाने या शाळेतील १२ मुली प्रार्थनेसाठी शाळेच्या बाहेर असल्याने १२ जणांचे जीव बचावले, दरम्यान १३ मार्च १८९६ मध्ये उभारलेली ही ब्रिटीशकालीन शाळा धोकादायक असून येथे विद्यार्थी बसवू नये असे मुख्याधिकारी यांनी सक्त आदेश दिले असताना शाळा येथे भरविली जात होती त्यामुळे मृत्यूच्या दाढेत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांतून होत आहे.
मंगळवेढा शहरात बँक ऑफ इंडियाच्या समोर असणाऱ्या नगरपालिका कन्या शाळा नंबर १ मध्ये पहिली ते चौथी पर्यत २३ विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील प्रशाला कायम ११ ते ५ या वेळेत असते, मात्र उन्हाळी दिवसाने सध्या सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरते. शनिवारी सकाळी प्रार्थनेसाठी मुले शाळेच्या बाहेर आली होती हा प्रकार बरोबर ७.१५ वाजता घडला जुन्या इमारतीची मोठी पाच ते सहा खांडे पडल्याने मोठा आवाज झाला. मोठ्या आवाजाने शेजारील अनेक नागरिक जमा झाले. चिमुकली ही आवाजाने भेदरली.
चार खोल्या असणाऱ्या या प्रशालेची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी १० ऑगस्ट २०१८ रोजी प्रशासनाधिकारी अनंतकवलस यांना ही इमारत धोकादायक असून येथे शाळा भरवू नये याऐवजी नगरपालिका शेजारी असणाऱ्या प्रशालेत सर्व विद्यार्थी स्थलांतरित करावेत असे लेखी पत्राद्वारे सूचित केले होते. त्याचबरोबर येथील मुख्याध्यापक क्षीरसागर यांनीही १ एप्रिल २०१८ व १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रशासनाधिकारी यांनी लेखी पत्र देऊन शाळेची दुरावस्था झाल्याबद्दल संगीतले होते, मात्र याबाबत प्रशासनाधिकारी यांनी या पत्राची दखल न घेतल्याने अद्याप ही शाळा या धोकादायक इमारतीत भरत होती मृत्यूच्या दाढेत विद्यार्थी शिक्षण घेत होते आज दुर्दैवाने एकाद्या चिमुकल्या ची जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालक विचारात आहेत.
कन्या शाळा १ या शाळेची इमारत धोकादायक असून येथे विद्यार्थी बसवण्यात येऊ नयेत असे १० ऑगस्ट रोजी प्रशासनाधिकारी याना लेखी पत्राद्वारे सुचविले होते तरीही या पत्राची गंभीरपणे दखल न घेता येथे शाळा भरवणाऱ्या प्रशासनाधिकारी यांच्यावर कारवाई करावी असे शिक्षण उपसंचालक याना पत्राद्वारे कळविले आहे - पल्लवी पाटील , मुख्याधिकारी मंगळवेढा