अक्कलकोट : मागील वर्षी आलेल्या कोरोनामुळे अनेकांच्या दैनंदिन व्यवसायात बदल झाले आहेत. पुणे, मुंबईचे काहीजण गावाकडे आले. मात्र परत न जात स्वत:ची शेती व्यवसाय थाटला आहे. अशाच बदलातील अनेकातील अब्दुल सत्तार शेख हे एक. स्कूल बसचा मूळ व्यवसाय मोडीत निघाला. मात्र, हतबल न होता सुरू केलेल्या रिक्षा व्यवसायाने तारल्याचे वास्तव त्यांनी काेरोनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मांडले.
२२ मार्च रोजी लॉकडाऊनला वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्ताने अब्दुल सत्तार यांनी कडू-गोड आठवणींना उजाळा दिला.
२२ मार्च रोजी संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला. शाळा बंद झाल्या. विद्यार्थी वाहतूक बंद झाली. काही दिवस कोरोनाच्या भीतीने घरीच बसून रहावे लागले. त्यांनी दुसरा व्यवसाय शोधला. रिक्षा व्यवसाय सुचला आणि सुरूही केला. पूर्वीसारखे उत्पन्न नसले तरी संसाराचा गाडा हाकून त्यात समाधान मानत आहेत.
शहरातील इंडियन मॉडेल स्कूल, मंगरुळे हायस्कूल, सीबी खेडगी शाळा, कल्याणशेट्टी शाळा, लीड स्कूल, शिवपुरीची शारदा माता शाळा अशा अनेक शाळांच्या विद्यार्थी वाहतूक चालक, मालकांवर आर्थिक संकट ओढवले. एकटे सत्तार बेरोजगार झाले नाहीत तर असंख्यजण बेरोजगार झाले. परंतु वेगळा व्यवसाय सुरू करून संसाराची गाडी सुरळीत केली. मुंबई, पुणे शहरात स्थलांतरित झालेले हजारो लोक मूळगावी परतले. काहींनी शहराची वाट न धरता शेती, दुग्धव्यवसाय करीत आहेत.
---
उधळपट्टी थांबली, काटकसर, बचतीची सवय जडली
कोरोनाविराेधात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अनेकांनी भाजीपाला, फळांचा वापर वाढविला. मास्कची सवय लावून घेतली. लग्न कार्यावरचा मोठा खर्च आटोक्यात आला. उधळपट्टी थांबली. बचतीची सवय लागली. स्वच्छतेची सवय लागली. संकटात आपले कोण, परके कोण याचीही माहिती झाली.
---
अब्दुल सत्तार साखरेच मशाक पठाण, ज्ञानदेव पुजारी, समीर शेख, इम्रान शेख, राजकुमार कदम, जावेद मुल्ला, हुसेन शेख, राठोड अशी कैक मंडळी या व्यवसायात गुंतली. मात्र त्यांच्यापुढे बँकेचे कर्जाचे डोंगर उभे झाले. या संकटाने खचून न जाता कोणी भाजीपाला तर कोणी फळे विकायला सुरुवात केली. काहींनी घरबसल्या मास्क व्यवसाय सुरू केला.
----
२२ अक्कलकोट अब्दुल सत्तार
विद्यार्थी वाहतूक करणारे अब्दुल सत्तार शेख आता रिक्षा चालविताना दिसत आहेत.