कोरोना महामारीमुळे अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांची व्यथा नवीन राहिली नाही. यावर मात करीत लोकांना आवश्यक व गरजेच्या व्यवसायाकडे वळून नवनवीन क्लृप्त्या शोधत धडपडणाऱ्या तरुणांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. सुनील केंगार या तरुणाने मारुती व्हॅन खरेदी करून स्कूल बस तयार केली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून स्कूल बस बंद अवस्थेत होती. अखेर रोजीरोटीसाठी पर्याय म्हणून यामधील व्यवस्था बदलून लोकांना गरजेचा असणारा भाजीपाला वाड्या-वस्त्यांवर पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू करून तरुणांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
ताजा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत
भाजीपाला खरेदीसाठी यापूर्वी ग्राहकांना दुकानदारापर्यंत जावे लागत होते. मात्र सुनील केंगार या तरुणाने आपल्या गाडीतच वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला संकलित केला. स्पीकरद्वारे लोकांना भाजीपाला उपलब्ध असल्याची माहिती दिल्यामुळे ग्राहक आकर्षित होतात. याशिवाय ताजा व स्वच्छ भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत ग्रामीण भागात आपला विशेष हातखंडा प्रचलित केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ने-आण करणारा काका सध्या भाजीपाला व्यापारी बनला आहे.