प्रभू पुजारी
सोलापूर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अजूनही झेडपीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत; मात्र मुलांना क्रमिक अभ्यासाची पुस्तके मिळाली आहेत़ ही मुले आता घरात स्वत:च अभ्यास करू लागली आहेत. शिवाय आई-वडिलांना शेती कामातही मदत करू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.
खासगी शाळांमधील शिक्षक आॅनलाईनद्वारे शिकवू लागले आहेत़ काही झेडपी शाळेतील शिक्षकही आॅनलाईन शिक्षण देऊ लागले आहेत; पण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे़ शासनानेही दूरदर्शन चॅनलच्या माध्यमातून रोज प्रत्येक इयत्तेसाठी ठराविक वेळेत अभ्यासक्रम सुरू केला आहे़ पण तो अभ्यासक्रम किती मुले पाहतात़ हे सांगणे कठीण आहे.
ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असली तरी शाळकरी मुले आई-वडिलांना मदत करताना दिसतात़ अभयचे आई-वडील शेती करीत आहे़ त्यास लहान भावंडे असून त्यांना ही सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचे तो सांगतो़ हे सर्व करीत असलो तरी शिक्षकांनी दिलेल्या भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, भूगोल, इतिहास या सर्व विषयाचे रोज थोडे-थोडे अभ्यास करतो़ म्हशीवर बसून अभ्यास करताना आनंद होतो, असे अभय सांगत होता.
मुले राबू लागली शेतातयावर्षी प्रत्येक नक्षत्रात पाऊस पडला आहे़ त्यामुळे सध्या शेतात खरीप हंगामातील पिके जोमात वाढली़ त्याची आता काढणी आणि मशीनद्वारे मळणी सुरू आहे़ शिवाय काही ठिकाणी ऊस, कांदा लागवडही चालू आहेत़ या सर्व कामात शाळेतील मुले आई-वडिलांना मदत करताना दिसत आहेत़ काही लहान मुले शेतीत काम करीत नाहीत; पण पाणी, जेवणाचा डबा शेतात पोहोच करण्याचे काम करीत आहेत़
पाचवीतलं पोरगं लय हुशारच!
- - तेलगाव (सीना) येथील अभय छत्रे हा मुलगा सध्या पाचवी इयत्तेत आहे़ पण शाळा बंद असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला म्हैस चारण्यासाठी पाठविले़ या पठ्ठ्यानं चालून पाय दुखू नये किंवा कंटाळा येऊ नये म्हणून चक्क म्हशीबरोबर मैत्री केली अन् तिच्या पाठीवर बसूनच अभ्यास सुरू केला.
- - रस्त्याच्या कडेनं, बांधावर ज्या ठिकाणी गवत आहे त्या ठिकाणी त्यानं म्हशीला अन् तिच्या रेडकाला हिंडवून आणलं़
- - इकडं म्हशीचं पोट भरलं म्हणून ती जास्त दूध देऊ लागली अन् पोरानं म्हैस हिंडवून आणली म्हणून वडील खूश़ शिवाय आपलेही पाय दुखले नाहीत म्हणून हाही आनंदी़ एकूणच काय तर पाचवीतलं हे पोरगं लय हुशारच!