नासीर कबीर
करमाळा : निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोक ादायक बनल्या आहेत. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. जि.प.च्या बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या खोल्या पाडण्याचा अहवाल वर्षापूर्वीच देऊनसुध्दा अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे.
करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेस एकूण ९ वर्गखोल्या असून, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. शाळेची पटसंख्या १२२ आहे. वर्गखोल्या क्रमांक एक व ४ स्वातंत्र्यपूर्व काळातील १९४२-४३ सालातील आहेत. दगड, माती, कौलारू खोल्या अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. खोेली क्र. दोन व तीनमध्ये विद्यार्थीशिक्षण घेतात.
या खोल्यांच्या भिंतींना भेगा पडल्या असून, भिंती फुगल्या आहेत. वर्गखोल्यांवरील कौले, लाकूड, पत्रे, आरसीसी स्लॅब, बीम, लिंटेल खराब झाले आहेत. पावसाळ्यात खोल्या गळतात. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांनी ठराव करून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना गेल्या दोन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र अद्यापही दखल न घेलयने गावकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
खोल्यांमध्ये माती पडते- वर्गखोल्या एवढ्या धोकादायक झाल्या आहेत की, छतावरील माती नेहमीच पडत असते. स्लॅबवर गिलावा केलेले ढपले पडणे नित्याचेच झाले आहे. धोकादायक खोल्यांमध्ये लोकसभा, विधानसभासह प्रत्येक निवडणुकीचे मतदान केंद्र उभारले जाते. विद्यार्थी रोजच या शाळेत बसून शिक्षण घेतात. सुदैवाने अद्याप तरी कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.