सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मुंबईतील सलाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ११ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी मोहीम घेण्यात येणार आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाºयांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. प्रत्येक शाळाने शाळा आणि शाळाबाह्य परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी अभियान राबवायचे आहे. यासाठी शाळांनी कोणकोणते प्रयत्न केले, याची फाईल तयार करायची आहे. यासाठी ११ निकष ठरविण्यात आले असून, ३१ डिसेंबरपासून या निकषावर कशा पद्धतीने काम केले, याची नोंद फाईलमध्ये करायची आहे. त्याचबरोबर ही फाईल टोबॅको फ्री स्कूल या अॅपवर डाऊनलोड करावयाची आहे. अॅपवर ही माहिती कशी भरायची याची माहिती देण्यासाठी सलाम व सारथी युथ फाउंडेशनचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थेच्या प्रतिनिधींचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. ११ आॅक्टोबर: अक्कलकोट, सांगोला, १३ आॅक्टोबर: करमाळा, २० आॅक्टोबर: माळशिरस, १७ आॅक्टोबर: मंगळवेढा, १५ आॅक्टोबर: मोहोळ, १६ आॅक्टोबर: उत्तर सोलापूर, २३ आॅक्टोबर: दक्षिण सोलापूर. या कार्यशाळेला विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांनी हजर रहावे, असे आवाहन राठोड यांनी केले आहे. ज्यांना अडचणी येतील त्यांनी डॉ. स्वप्निल गायकवाड, रामचंद्र वाघमारे, अमित महाडिक यांच्याशी संपर्क साधावा.
तर पोलिसांची मदतशाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही ग्रामीण भागात हे पाहिले जात नाही. त्यामुळे शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी ही मोहीम घेतली आहे. शाळेच्या बाजूला असलेल्या टपºयांवर तंबाखू व इतर पदार्थ्यांची विक्री होत असेल तर याबाबत संबंधित दुकानदारास परावृत्त करायचे आहे. पण हे बंद न झाल्यास पोलिसांची मदत घ्यायची आहे. शाळांच्या आवारात येणाºयांना तंबाखू सेवनास बंदी घातली पाहिजे. यासाठी शाळेचे प्रवेशद्वार व परिसरात याचे फलक लावावेत. गरज भासल्यास लोकांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम पटवून देण्यासाठी पोस्टर प्रदर्शन ठेवावे.