कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माढा तालुक्यात बंद असलेल्या शाळा या मध्यंतरी ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या; मात्र तालुक्यात अनेक गावांतून मोबाईलला रेंज नसणे, तांत्रिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवताना शिक्षकांनाही अनेक समस्यांचा खूप त्रास सहन करावा लागला. यावर मात्र काहीही उपाय नसल्याने प्रशासनाला याबाबत काही करता आले नाही; मात्र गेल्या काही दिवसात कोरोना कमी होत गेला. मुलांच्या शिक्षणाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे अग्रेसर बनले.त्यांनी कोरोनामुक्त गावातील कोरोना समितीशी चर्चा करून शक्य आहे तिथे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या शिक्षण विभागाला सूचना दिल्या. त्यामुळे याबाबत माढा तालुक्यातील कोरोनामुक्त ७२ गावांत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सर्व्हे केला. संबंधित सर्व गावातील शाळा १५ जुलैपासून सुरू करण्याची तयारी केली आहे.
--
सहा झेडपी तर ३१ खासगी शाळा
माढा तालुक्यात इयता आठवी ते बारावीपर्यंत वर्ग असणाऱ्या एकूण १०० शाळा आहेत.त्यापैकी कोरोना मुक्त ७२ गावांतील ४० शाळा आता सुरू होणार आहेत. तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांना बऱ्याच दिवसांनंतर वर्गात जायला मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रत्येक शाळेत कोरोनाबाबत खबरदारी घेतली जाणार आहे. याबाबत पालकांनाही सतर्क केले आहे. सुरू होणाऱ्या ४० शाळेत ६ जिल्हा परिषदेच्या, ३१ खासगी अनुदानित व ३ स्वयंम अर्थसहायित आहेत. यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, विस्तार अधिकारी बंडू शिंदे व समग्र शिक्षा अभियानांतर्गत असणारा शिक्षक वर्ग परिश्रम घेत आहेत.
.............
माढा तालुक्यातील ७२ कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा १५ जुलैपासून सुरू करण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना आहेत. त्याची तयारी झाली आहे.याबाबत या संबंधित गावांतील कोरोना समितीशी संबंधित शाळांनी चर्चा केली आहे.
- मारुती फडके
गटशिक्षणाधिकारी, माढा