सांगोला : रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होताच पुरवठा विभागाच्या पथकाने कडलास (ता.सांगोला) येथील आबाजी कृष्णा भजनावळे यांच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली. तपासणी दरम्यान दुकानात कोणतेही धान्य शिल्लक नव्हते. तसेच दप्तरही उपलब्ध नव्हते. नियमानुसार साठा रजिस्टर भरले नव्हते. त्यामुळे रेशन कार्ड रजिस्टरशी ताळमेळ बसत नसल्याचे तपासणीत आढळून आले. यामुळे आबाजी भजनावळे यांचे स्वस्त धान्य दुकान सील केल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली.
कडलास येथील आबाजी कृष्णा भजनावळे यांच्या स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना शासन निर्देशानुसार धान्य वितरित होत नसल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. जवळपास १०९ रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. नायब तहसीलदार किशोर बडवे, पुरवठा अधिकारी श्रीमती अश्विनी दराडे, कडलासचे तलाठी यांच्या पथकाने भजनावळे यांच्या रेशन दुकानाची अचानक तपासणी केली. दुकानात बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा यादी प्रकाशित केली नाही, दक्षता समितीचा फलक लावला नाही, रेशन कार्ड अद्ययावत नाही. धान्याचे नमुने पारदर्शक बरणीत ठेवले नाहीत. पीडीएस तक्रार विवरण प्रणाली नंबर प्रसिद्ध केला नाही. दुकानात कोणत्याही प्रकारचे धान्य शिल्लक नसल्याने, नोंदवह्या दररोज लिहिल्या जात नाहीत, रेशन कार्ड रजिस्टरशी ताळमेळ बसत नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी दुकानाचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांच्याकडे सादर केला होता. मागील काळात या दुकानातून १०९ कार्ड धारकांना धान्य मिळाले नाही. तसेच १६.५ क्विंटल गहू व ९.५ क्विंटल तांदूळ उपलब्ध असणे आवश्यक होते. मात्र रेशन दुकानात धान्य साठा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यानंतर दुकान सील करण्यात आले.