कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना मोफत धन्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यातच स्वस्त धान्य काळ्याबाजारात जात असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
४ मे रोजी करमाळा तालुक्यातील काही जण रेशनिंगचा तांदूळ आणि गहू नागरिकांना न देता काळ्याबाजारात विक्री करणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार राशीन कर्जत रोडवर वीट येथील बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय २५), रेवणनाथ मुरलीधर ढेरे (वय ३९) व श्रीकांत प्रकाश ढेरे (वय २५) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचे स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्याबाजारात विक्री करणार होतो, असे कबूल केले. संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५५ किलोच्या ७२ गोण्या तांदूळ व ८ गोण्या गहू व दोन चारचाकी वाहने असा सुमारे १० लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान शिरसाठ करत आहेत.
ही कारवाई तहसीलदार माने, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे व तलाठी प्रशांत गौडचर यांच्या मदतीने करण्यात आली.
----
धान्य नेमके कुठले?
तहसीलदार माने म्हणाले, स्वस्त धन्य दुकानातून धान्य काळ्याबाजारात जात असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार एकाला गाडीच्या मागे पाठवण्यात आले. कर्जत हद्दीत गाडी पकडल्यामुळे तेथील पोलिसांत फिर्याद देण्यात आली. मात्र, हे धान्य शालेय पोषण आहाराचे आहे की इतर कशाचे, हे अजून उघड झाले नाही. संशयावरून २ स्वस्त धान्य दुकाने तत्काळ सील केली आहेत.
---