सोलापूर : रस्त्यावरून धावणाऱ्या चार चाकी जुन्या स्क्रॅप गाड्यांचा आरटीओकडून शोध सुरू झाला असून, कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने जुन्या गाड्या बंद केल्या आहेत.
३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या अद्याप रस्त्यावर धावताना दिसत असल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने मंडई विभागातील अतिक्रमणसाठी वापरण्यात येणारा मालट्रक (क्र. एमएचक्यू-५११९) ही बंद केला आहे. तर महानगरपालिकेसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून वापरण्यात येणारे टँकर (क्र.एमसीयू-१२५३) बंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या किंवा भाड्याने घेतलेल्या कोणत्याही जुन्या गाड्या रस्त्यावरून धावणार नाहीत याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.
महापालिकेने काळजी घेतली असली तरी शहरातील अन्य सरकारी कार्यालयातील गाड्या जुन्या आहेत; मात्र रस्त्यावर धावतात. याचा शोध घेतला जात आहे. बहुतांशी गाड्या परवाना नसतानाही रस्त्यावर धावतात. अशा गाड्यांचा शोध घेऊन जप्तीची व दंडाची कारवाई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) केली जाणार आहे.
शहरातील प्रमुख मार्गांवर लक्ष केंद्रित
- शहरातील प्रमुख मार्गांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी थांबणार असून जुन्या गाड्या दिसताच त्यांच्यावर कारवाई करणार आहेत.
- गाडी सरकारी असो किंवा खासगी जुनी असेल किंवा पासिंग नसेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई होणार आहे.
- या कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.