भीमानगर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं. २ येथे ऊस गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या ऊस बिलाचा प्रतिमेट्रिक टन २०० रुपयेप्रमाणे दुसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे.
अधिक माहिती देताना कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनराव शिंदे म्हणाले, गळीत हंगाम सन २०२०-२१ मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नं. १ पिंपळनेर येथे १५ लाख एक हजार ८४४ मे. टन उसाचे गाळप करून ११.२० (बी. हेव्हीसह) टक्के साखर उताऱ्याने १४ लाख ७१ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
तसेच युनिट नं. २ करकंब येथे तीन लाख ८३ हजार ५३८ मे. टन उसाचे गाळप करून १०.८३ टक्के साखर उताऱ्याने चार लाख १५ हजार ३९० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. ऊस गाळप हंगाम २०२०-२१ साठी युनिट नं. १ व २ कडील एकूण निव्वळ देय एफआरपी प्रति मे. टन २३७६.९८ इतकी आहे. एकूण देय एफआरपी ऊसबिलापैकी कारखान्याने पहिल्या हप्त्यापोटी प्रति मे. टन २००० रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केले आहेत. उर्वरित देय ऊसबिलापैकी प्र.मे. टन २०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता सर्व संबंधित ऊस पुरवठादार सभासद/ बिगरसभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. त्यापोटी कारखान्याने ३७ कोटी ७० लाख रुपये बँकेत वर्ग केले आहेत. त्यासाठी उर्वरित तिसऱ्या हप्त्यापोटी देय १७६,९८ रुपयांप्रमाणे ऊसबिलाची रक्कम धोरणाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
तसेच कारखान्याने ऊस गळीत हंगाम २०२०-२१ चे संपूर्ण कमिशन डिपॉझिट रक्कम ऊस वाहतूकदारांना यापूर्वीच अदा केली आहे. जागतिक पातळीवर साखरेचे दर घसरल्यामुळे सध्या साखर निर्यात करणे अडचणी येत आहेत. तसेच देशांतर्गत साखरेस उठाव नाही. त्यामुळे दरमहा कारखान्यांना येणारा साखर विक्री कोटाही विक्री होत नाही. तसेच विक्री केलेल्या साखरेचीदेखील उचल होत नाही. सदरच्या शिल्लक साखरेमुळे व्याजाचा भुर्दंड वाढत आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाने साखर उद्योगाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा साखर कारखानदारी कोलमडून जाईल. आजपर्यंत ऊस पुरवठादारांनी जसा विश्वास दाखविला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या गळीत हंगामामध्येही संबंधित ऊस पुरवठादारांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिंदे यांनी केले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, सर्व संचालक मंडळ, प्र-कार्यकारी संचालक एस.आर. यादव व इतर अधिकारी उपस्थित होते.