सांगोला : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सांगोला तालुक्यात सुरवात झाली आहे. या अगोदर लस दिलेल्या १७५० जणांपैकी ४४० जणांना २८ दिवसानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस दिला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमणी यांनी दिली.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, नगरपालिका, पोलीस, तहसील कार्यालय, फ्रंट लाईनवर असणारे अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना लसीचा पहिला डोज देण्याचे निर्देश दिले होते. सांगोला तालुक्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. त्यानुसार सांगोला तालुक्यातील १७५० जणांना कोरोना लसीचा पहिला डोज सांगोला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला. फ्रंटलाईनवर असलेल्या आरोग्य विभागातील कोरोना योद्धयांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली.
पहिल्या टप्प्यातील कोविडशिल्ड लसीकरणाला २८ दिवस पूर्ण झाल्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोज देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४४० जणांना दुसरा डोज दिला. प्रशासन व आरोग्य विभागाकडून जागृतीचे कार्य सुरू असल्याने लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वांची प्रकृती ठणठणीत असून कोरोना लसीबाबतचे गैरसमज दूर झाल्याने लसीकरणाचा वेग वाढला. त्यामुळे तालुक्याची वाटचाल आता उद्दिष्टपूर्तीकडे सुरू झाली. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्या सर्वांची प्रकृतीही ठणठणीत आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.