: माढा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातला कोरोनाचा प्रसार वरचेवर वाढत चालला आहे. गेल्या १० दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२ वर पोहोचली आहे. यात प्रामुख्याने टेंभुर्णी व निमगाव (टे) ही दोन गावे कोरोनाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.
माढा तालुक्यात मंगळवारपर्यंत ७२ रुग्ण बाधित असून, त्यापैकी गेल्या १० दिवसांत बाधित रुग्णांपैकी जवळपास २० टक्के हे निमगाव (टें) मधील आहेत. आतापर्यंत तालुक्यात कुर्डुवाडी, कन्हेरगाव, टेंभुर्णी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे तिघांचा दुसऱ्या टप्प्यात मृत्यू झाला आहे.
कोरोना आपल्या ग्रामीण भागात येऊन ठेपला, तरीही नागरिकांकडून म्हणावे तसे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. गावचावडीवर, लग्नकार्यात, इतर सभांत, समारंभात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याचे दिसत आहेत.
प्रशासनाने कोरोनासंबंधी निर्देशित केलेले नियम धाब्यावर बसवून सर्व कार्यक्रम राबवत आहे. याला प्रशासनाची डोळेझाक आणि नागरिकांची बेजबाबदारी ही दोन्हीही कारणे जबाबदार आहेत. प्रशासनाने व नागरिकांनी वेळीच सतर्कता बाळगून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असाही सूर सुजाण नागरिकांमधून उमटू लागला आहे.
----
सुपरस्प्रेडर, कोमार्बीड रुग्णांची यादी
दहा-बारा दिवसांत निमगाव (टे) गावात १२ रुग्ण वाढले आहेत. तेथील आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक पाठवून तिथे सर्व्हे केला आहे. ज्या घरात बाधित रुग्ण आढळले, त्याच्या संपर्कातील लोक बाधित आढळले आहेत. तेथील तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत ७५ जणांची तपासणी झाली आहे. जे लोक बाहेरगावी नोकरीनिमित्त ये-जा करत आहेत. तसेच जे सुपरस्प्रेडर आहेत. शिवाय, किराणा दुकानदार, पानटपरी, कोमार्बीड रुग्णांची यादी बनवून तपासणी केली जाणार आहे. यानुसार सर्व उपाययोजना राबविल्या जात असल्याचे माढा तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी थोरात यांनी स्पष्ट केले.
..................