सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात महापालिका प्रशासनाने व्कारंटाइन सेंटर्ससाठी वसतिगृहांच्या इमारती ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड राखीव करण्यासोबत कर्मचाऱ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.
दिवाळीनंतर दिल्ली, गुजरात आणि मध्यप्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरातही गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या व्कारंटाइन सेंटर उपलब्ध आहेत. यापुढील काळात इतर महाविद्यालयांची वसतिगृहे ताब्यात घेण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के आयसीयू बेड कोरोनाबाधीत रुग्णांसाठी राखीव ठेवावेत, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, रुग्ण संख्या वाढल्यास यात पुन्हा वाढ करण्यात येणार आहे. कोणताही रुग्ण दगावू नये. वेळेवर उपचार व्हावेत यासाठी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रशिक्षण मिळावे असा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचे मत आहे. आगामी दिवसांत डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण वर्ग सुरू होतील, असेही पांडे यांनी सांगितले.