मागील मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून लावलेला लॉकडाऊन तब्बल नऊ महिने वाढवला. त्यामुळे मोठ्या शहरातील अनेक तरुण गावाकडे आले. या कालावधीत कोणी शेती निवडली, कोणी भाजी विकली तर कोण छोटेमोठे व्यवसाय करत कसाबसा कालावधी घालविला. त्यानंतर गेल्या जानेवारीपासून अर्थव्यवस्था जवळपास पूर्वपदावर येत शहरातील नोकऱ्या पुन्हा सुरू झाल्या. ग्रामीण भागातील व्यवसाय, शेतीची कामेही पुन्हा सुरू झाल्याने प्रत्येकाला रोजगार मिळत होता. मागील वर्षात काय कमावले, काय गमावले यापेक्षा रोजीरोटी भागत असल्याने सर्वसामान्य नागरिक समाधानी असतानाच ३० मार्चनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली.
त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता पुन्हा मिनीलॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे अनेक लहानमोठे उद्योग, व्यवसाय पुन्हा ठप्प झाले आहेत. त्यामुळे शहराकडे गेलेले तरुण पुन्हा गावाकडे वळू लागले आहेत. गावात शेतीची कामे सुरू असली तरी त्यावर अवलंबून असलेले खते, बी-बियाणे, अवजारे, कीटकनाशके, सिंचनावर आधारीत सर्व व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतीची सर्व कामे बंद झाली आहेत. मजुरांच्या हाताला काम नाही. अशी करुणाजनक परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.
-----
शासनाचे आर्थिक पॅकेज ग्रामीण भागात पोहोचेना
मागील वर्षी लॉकडाऊन करताना राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज अनेक दिवस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले नव्हते. यावर्षीही तोच अनुभव येत आहे. सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. बांधकाम कामगार, रिक्षाचालक आदींना आर्थिक मदतीचीही घोषणा झाली. मात्र ते पॅकेज अद्यापपर्यंत गरजू नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाही. सरकार लॉकडाऊन जाहीर करून मोकळे होते, आम्ही जगायचे कसे? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शेती आधारित दुकाने सुरू ठेवा
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण अर्थकारण ८० टक्केपेक्षा जास्त शेती व पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे शहर व ग्रामीण भागातील शेतीवर आधारित असणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे, वीजपंप, पाइप व इतर दुरुस्तीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेली सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतीवर आधारित दुकाने, व्यवसाय सुरू ठेवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शेतीमालाचे भाव पुन्हा गडगडण्याची शक्यता
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी व इतर फळबागांचे दर २५ टक्क्यांवर आले होते. काही शेतकऱ्यांचा माल तर २५ टक्क्यांनीही विकत घेण्याचे धाडस करत नव्हते. त्यामुळे वर्षभर पिकविलेला माल बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी तरी ती कसर भरून निघेल अशी अपेक्षा होत असताना काही दिवसात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, केळीचे नुकसान झाले. तर आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने व्यापारी संगनमत करत शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे पुन्हा फळबागांचे दर गडगडण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.