आप्पासाहेब पाटील
सोलापूर : स्वच्छ सोलापूर... सुंदर सोलापूर या उद्देशाने महापालिका आता वेगाने कामाला लागली आहे. शहर कायम स्वच्छ राहावे यासाठी विविध पथकेही नियुक्त केले आहेत. सोलापुरातील नागरिकांनी शहरातील कोणत्याही भागात कचरा अथवा अस्वच्छता दिसल्यास त्वरित फोटो काढून महापालिकेला पाठविल्यास संबंधित परिसर ४८ तासात तो कचरा उचण्यात येणार आहे. याबाबतची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त शितल तेली- उगले यांनी दिली.
सध्या शहरातील स्वच्छतेला महापालिका प्रशासन जास्त प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे. सकाळी व दुपारच्या सत्रात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या विविध भागात फिरत आहे. साधारणत: साडेतीनशे टन कचरा जास्त उचलण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली. शिवाय ज्या भागात कचरा गाड्या वेळेवर येत नाही, त्या भागातील नागरिकांनी झोन कार्यालयाकडे तक्रार करावी, असेही आयुक्तांनी कळविले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सोलापुरातील प्रत्येकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असेही आवाहन केले आहे.
असे पाठवा कचऱ्याचे फोटो...
गुगल प्ले स्टोअरवरून परिवर्तन सोलापूर ॲप डाऊनलोड करा. ॲप सुरू केल्यावर कंपलेंटन्सवर क्लिक करा, नवीन तक्रार नोंदविण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या पेन्सिलच्या चिन्हावर क्लिक करा, सर्च केल्यावर गारबेज टाइप केल्यावर त्यावर क्लिक करा, तक्रारीची माहिती लिहा, ठिकाणाची माहिती द्या, पोस्ट करा, सबमिट करा. तक्रार ४८ तासात पूर्ण होणार कचरा किंवा अस्वच्छतेसंदर्भात तक्रार परिवर्तन सोलापूर ॲपवर दाखल झाल्यानंतर संबंधित घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेची टीम ४८ तासात त्या तक्रारीचे निराकारण करणार आहे. त्यासंदर्भातील आदेश पालिका आयुक्तांनी दिल्याचेही सांगण्यात आले.