सोलापूर : शहर परिसरात सोमवारपासून लॉकडाऊनचे निर्बंध हटवून खरेदी विक्रीसाठी पूर्णवेळ मुभा देण्यात आली. त्यामुळे शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये सोमवारी प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. रुग्ण संख्या वाढेल, अशी भीती प्रशासनाला आहे. ग्रामीण भागातदेखील काही प्रमाणात अशीच स्थिती दिसली. निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सोमवारी शहरातील काही बाजारपेठांमध्ये फेरफटका मारला. दुकानांची पाहणी केली. गर्दी पाहून त्यांनी डोक्यावर हात मारला. इतर अधिकाऱ्यांचाही अनुभव असाच होता.
शहर व ग्रामीण परिसरात अशीच परिस्थिती राहिल्यास पुन्हा खरेदी-विक्री सवलतीच्या वेळेत कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागेल. याकरिता मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे. सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सोलापुरात नव्हते. मंगळवारी त्यांच्या समक्ष सोलापुरातील गर्दीवर चर्चा होणार आहे. गर्दी वाढू नये. त्याकरिता पुन्हा सवलतीच्या वेळेत कपात करता येईल का?, यावर मंथन होणार आहे. मनपा, तसेच पोलीस प्रशासनाशी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तूर्त सोमवारपासून मनपा व जिल्हा प्रशासन गर्दीच्या प्रकरणावरून चिंतित आहे.
शहर परिसरात स्टेज दोनचे नियम लागू आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट पाच टक्के खाली असल्यामुळे शहरात स्टेज दोन लागू आहे. याअंतर्गत खरेदी-विक्रीसाठी सर्व दुकानांना पूर्णवेळची मुभा देण्यात आली आहे. दुपारी चारपर्यंत दुकाने सुरू आहेत. तसेच ग्रामीण परिसरात दुपारी चारपर्यंत बाजारपेठा खुल्या आहेत.
आज अनेक बाजारपेठांची पाहणी
शहर व ग्रामीण परिसरातील परिस्थितीची पाहणी करण्याकरिता आज अनेक बाजारपेठांची पाहणी केली. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंचे पालन होत नव्हते. प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करून खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केली. खरेदीसाठी एकाच माणसाची आवश्यकता असतानाही परिवारातील अनेक सदस्य मिळून बाजारपेठांमध्ये गर्दी केली. चित्र भयानक होते, चिंताजनकही. कृपया बाजारपेठांमध्ये अनावश्यक गर्दी करू नका. काळजी घ्या. सुरक्षित अंतर राखा. मास्क वापरा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध घालावे लागतील, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी केले आहे.