सोलापूर : आयुष्यात स्पर्धा असायलाच हवी़ स्वत:ला घडायचे असेल तर स्पर्धेत उतरलेच पाहिजे़ आवडीचे क्षेत्र निवडा, त्यात स्पर्धा करा, भवितव्य जरुर घडेल, एखादा कोणीतरी सचिन तेंडुलकरही घडू शकेल, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ एऩ एऩ मालदार यांनी केले़ लोकमत व डी. एच. बी. सोनी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर -२०१४’ चे उद्घाटन डॉ़ मालदार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, डी़एच़बी़ सोनी महाविद्यालयाचे चेअरमन के. के.मर्दा, संचालक सतीश मालू, लोकमतचे सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे, पवार मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे बंडू पवार आणि व्याख्याते तथा सुपर अचिव्हरचे विवेक मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती़ लोकमतचे संस्थापक संपादक श्रध्देय स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या शैक्षणिक प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकमतचे सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनाची व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी कुलगुरु डॉ. मालदार म्हणाले की, बारावीनंतर कुठली शाखा निवडावी हा विद्यार्थी व पालकांपुढे मोठा प्रश्न असतो. पण लोकमतने बारावीनंतरचे कोर्सेस, अभ्यासक्रम यासंबंधीची माहिती एकाच छताखाली आणून विद्यार्थी-पालकांची धावपळ वाचविली आहे. सोलापूर विद्यापीठ हे शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करणारे विद्यापीठ असल्याचे सांगून युवकांमधून सुटत चाललेले सामाजिक भान या मुद्यावर डॉ़ मालदार यांनी चिंता व्यक्त केली़ यावेळी लक्ष्मीकांत सोमाणी, जवाहर जखोटिया, अजय बाहेती, गिरीधारी भुतडा, डॉ. राजगोपाल करवा, ओमप्रकाश सोमाणी, आनंद भंडारी आदी उपस्थित होते. -------------------------------सामाजिक बांधिलकी जपणारे शैक्षणिक उपक्रम : मर्दाविशेष अतिथी म्हणून बोलत असताना डी़एच़बी़ सोनी महाविद्यालयाचे चेअरमन के. के़ मर्दा यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे शैक्षणिक उपक्रम लोकमत सातत्याने राबवित आहे, अशा उपक्रमात सातत्यपणा ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली़ दहावी, बारावीनंतर विविध क्षेत्रात संधी आहे, त्याचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन करुन लोकमतच्या सामाजिक उपक्रमाला सोनी महाविद्यालयाची सदैव साथ असेल, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुवर्णा कटारे यांनी केले.----------------------------------------------------मुलांच्या वर्तनावर लक्ष वेधावे: रासकरप्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी आजची तरुण पिढी, वर्तन या मुद्यावर जोर देत पालकांनी मुलांच्या वर्तनावर लक्ष वेधण्याची अपेक्षा व्यक्त केली़ विद्यार्थ्यांनी संगणक व मोबाईलचा वापर चांगल्याच कामासाठी करावा. याचा दुरूपयोग करुन समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. १२ वी नंतर काय? हा मुद्दा स्पष्ट करीत असताना एकदा निर्णय चुकला की भविष्य चुकले म्हणायचे़ चांगला विचार करा, चांगला निर्णय घ्या, कायदा पाळून गोष्टी करा, असा सल्ला देऊन लोकमतने विद्यार्थी व पालकांसाठी शैक्षणिक प्रदर्शन भरवून चांगले काम केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाची भावी दिशा कळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. -------------------------विद्यार्थ्यांच्या भेटी १० वी, १२ वी नंतर काय? कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा ? या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने फडकुले सभागृहाच्या तळघरात विविध शैक्षणिक संस्थांनी स्टॉल उभारले़ या स्टॉलवर विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी गर्दी केली होती़ कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा याबाबत स्टॉल प्रतिनिधीसोबत चर्चा केली, अभ्यासक्रमाचे पुढचे टप्पे, शैक्षणिक शुल्क, भविष्यातल्या रोजगाराच्या संधी अशा अनेक मुद्यांवर पालक-विद्यार्थ्यांनी माहिती घेतली़ पहिल्याच दिवशी शैक्षणिक स्टॉलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला़ प्रदर्शनाची पाहणीलोकमत व डी. एच. बी. सोनी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमत अॅस्पायर फेअरच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार व पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी फेअरमध्ये मांडण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन विविध महाविद्यालयातील बारावीनंतरचे शैक्षणिक अभ्यासक्रम, कोर्सेस यांची माहिती जाणून घेतली.
आवडेल तेच क्षेत्र निवडा : मालदार
By admin | Published: June 06, 2014 1:06 AM