सोलापूर : माढा तालुक्यातील मानेगाव येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी संस्कृती हरिश्चंद्र मोटे हिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. त्यामुळे तिची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली आहे. २०० पैकी १४८ गुण घेऊन ईडब्ल्यूएसमधून राज्यात तिने ३२ वा क्रमांक पटकावला. शाळेतील ३६ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सहशिक्षक गजानन जोकार यांनी मार्गदर्शन केले.
भाजप किसान मोर्चाच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
करमाळा : भाजप किसान मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी लक्ष्मण केकान, तर अयोध्या येथील सैनिक स्मारक ट्रस्टच्या सहसचिवपदी नरेंद्र ठाकूर आणि नरेंद्र महाराज सांप्रदाय तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिनेश मडके यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नगरसेवक महादेव फंड, अमरजित साळुंखे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, अमोल पवार, दीपक चव्हाण, जितेश कटारिया, मयूर देवी, अंगद देवकते यांची उपस्थिती होती.
करमाळ्यात युरिया खत वाटप
करमाळा : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र होटकर यांनी केलेल्या आवाहनानुसार बफर स्टॉकमधील युरिया खताचे वाटप करण्यात आले. तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी देवराव जाधव, कृषी उद्योगचे विक्री व्यवस्थापक एस. एस. पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास मिरगणे, सुजित बागल उपस्थित होते.
कोंडीत कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी कोंडी येथे आरोग्य केंद्र साकारण्यात आले आहे. या आरोग्य केेंद्राचे लोकार्पण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सरपंच सुरेश राठोड, उपसरपंच किसन भोसले, गणेश भोसले, डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. सनील पत्की, संदीप बापट उपस्थित होते.
रायगड पालखी सोहळ्याच्या अध्यक्षपदी काजोल कांबळे
कुर्डूवाडी : रायगड संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी काजोल वसंत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर आकाश भाेंडवे-पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. रायगड संस्थान जामखेड यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वढू आळंदीपासून किल्ले रायगड पालखी सोहळा आयाेजित करण्यात येणार आहे.