या बैठकीला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जी. डी. शेलार, प्रकल्प सहायक कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपअभियंता कमळे यांच्यासह ग्रामसेवक व विस्तार अधिकारी उपस्थित होते.प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी माझी वसुंधरा या अभियानात नेमके काय करायचे आहे हे सांगितले.
गावातील हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्राधान्याने काम करायचे आहे. गावातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या जागेचे हरितीकरण, उज्ज्वला योजनेची व्यापकता वाढविणे, जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, धूरविरहित स्वयंपाक, घरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन, जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, घनकचरा संकलन, विलगीकरण या गोष्टी प्राधान्याने करायच्या असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत विभागाने योजनेचे गांभीर्य ओळखून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिल्या. या चौदा गावांची निवड प्रायोगिक तत्त्वावर केली. ही योजना राबविण्यासाठी घेरडी, मोडनिंब, महुद बुद्रुक, मंद्रुप, यशवंतनगर, कासेगाव, वेळापूर, करकंब, टेंभुर्णी, वैराग, महाळुंग अशा दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांची निवड करण्यात आल्याचे चंचल पाटील यांनी सांगितले.