बार्शी : महाराष्ट्राच्या क्रीडा चळवळीत व शारीरिक शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेले बार्शी येथील डॉ. जगदीश झाडबुके यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण, क्रीडा व स्पर्धा अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली.
ते सध्या बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात कार्यरत असून, गेली चाळीस वर्षे डॉ. जगदीश झाडबुके हे क्रीडा विकास आणि शारीरिक शिक्षण विकास चळवळीत सक्रिय आहेत. याबद्दल त्यांचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
माढ्यात दोन दुकाने सील
माढा : वारंवार सूचना देऊनही लॉकडाऊन काळात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या माढ्यातील एका व्यावसायिकावर पोलिसांनी कारवाई केली आहे, तसेच १५ दिवसांसाठी त्यांच्या आस्थापनेला सील करण्यात आले आहे. माढा शहरातील शेटफळ चौकातील एका हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत हॉटेल व्यावसायिकास नोटीस काढून बंद ठेवण्याची सूचना दिली असताना हॉटेल चालू ठेवले होते. माढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण घोंगडे, पोलीस कॉन्स्टेबल संजय घोळवे, पेालीस नाईक पांडुरंग देशमुख यांनी ही कारवाई केली.
मानेगाव येथे बहुरूपी कलाकारांना जीवनावश्यक वस्तू
माढा : माढा तालुक्यात मानेगाव येथे नाथपंथी डवरी गाेसावी समाजातील भूमिहीन बहुरूपी कलाकारांवर लॉकडॉऊनमुळे कडक निर्बंध आले आहेत. त्यामुळे अशा उपेक्षित घटकांची उपासमार सुरू आहे. आशामंत फाउंडेशनच्या वतीने अशा नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फांउडेशनचे अध्यक्ष हनुमंत बारबोले, विजय शिंदे, दत्तात्रय थोरात यांनी मिळून जीवनाश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. यावेळी रामचंद्र भांगे, नेताजी उबाळे, धनाजी सस्ते, विजय गव्हाणे, पोलीस पाटील बालाजी शेगर, महादेव कांबळे, आबा पवार, संजय सस्ते, सार्थक गव्हाणे, कांतीलाल कोकाटे, धनाजी भांगे उपस्थित होते.
वीज पडून मुलाचा मृत्यू
आळंद : आळंदपासून जवळच असलेल्या काेरळ्ळी गावच्या शिवारात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसात झाडावर वीज पडून आडोशाला थांबविलेल्या एक १९ वर्षांचा मुलगा मरण पावला. अणवीरप्पा शांतप्पा सुतार असे मरण पावलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्या सोबत असलेल्या सिद्धप्पा शरणप्पा सुता हा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला. जखमीला उमरगा येथे उपचाराला हलविण्यात आले. आळंद पोलीस ठाण्याचे फौजदार मल्लण्णा यलगुंड व तलाठी प्रभुलिंग तट्टे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
औषध विक्रेत्यांना लस द्या
सोलापूर : जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगस्टी असोसिएशनने केली आहे. जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी कोरोना काळात अहोरात्र सेवा दिली. जिल्ह्यात दहापेक्षा अधिक मुख्य विक्रेत्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष बसवराज मणुरे, राजशेखर बरोले, सुरेश भगत, सिद्धेश्वर घाळे, सिद्धाराम चाबूकस्वार, मनीष बलदवा, व्यंकटेश पुजारी, कय्युम इनामदार यांची उपस्थिती होती.
जैन समाज सॅप क्रिकेट ग्रुपतर्फे मोफत भोजन
सोलापूर : लॉकडाऊन काळात अनेकांची रोजीरोटी बुडाली आहे. निराधारांची अन्नाची भटकंती सुरू आहे. जैन समाज सॅप क्रिकेट ग्रुपतर्फे रस्त्यावरील बेघर लोकांना मोफत भोजन देण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून सिद्धेश्वर मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल, पासपोर्ट कार्यालय, रेल्वे स्टेशन, येथे उपेक्षित लोकांना मोफत भोजन दिले जात आहे. दोन चपाती, भाजी, भात, आमरस, मिठाई असे भोजनाचे स्वरूप आहे. यासाठी ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र अकराणी, दिलीप चौधरी, चेतन संघवी, संदीप वैद्य, उत्तम चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.