मोडनिंब : राज्य शासनाने आयोजित केलेल्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत मोडनिंब ग्रामपंचायतीची सोलापूर जिल्हा परिषदेने निवड केली आहे.
याबाबत या अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीला दीड कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी मोडनिंब ग्रामपंचायत येथे आयोजित आढावा बैठकीत दिली. गावांमध्ये अन्य योजना राबवण्यासाठी शासनाचे दीड कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी गावातील डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी शोष खड्डे घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी शासन सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्लास्टिकमुक्त गाव करून कचऱ्यापासून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, स्वच्छ भारत मिशनचे सचिन जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर निशिगंधा माळी, वैभव ओहोळ, सज्जन जाधव, सुधीर पवार, ज्ञानेश्वर सुतार, सरपंच मीनाताई शिंदे, उपसरपंच दत्तात्रय सुर्वे, ग्रामविकास अधिकारी कालिदास मोहिते व विजय काटकर उपस्थित होते.
-----------