पुनवत : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व बंडा पाटील-रेठरेकर या दिग्गज मल्लांचा वारसा जपत शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथील अमोल पाटील, अवधूत पाटील व कणदूर येथील आशितोष पाटील या तीन मल्लांनी अहमदनगर येथील राष्ट्रीय पारंपरिक कुस्ती स्पर्धा गाजवून आंतरराष्ट्रीय आखाड्यात प्रवेश मिळविला आहे. रशिया येथे लवकरच या स्पर्धा होणार आहेत. अमोल पाटील याने पाच कुस्त्या जिंकून सुवर्णपदक, तर अवधूत पाटील व आशितोष पाटील यांनी रौप्यपदक पटकावले.अहमदनगर येथे झालेल्या राष्ट्रीय (पारंपरिक) स्पर्धेमध्ये अमोल नारायण पाटील हा बेल्ट रेसलिंग, तर अवदूत मुरलीधर पाटील व आशितोष एकनाथ पाटील हे मल्ल मास रेसलिंग कुस्ती प्रकारात सहभागी झाले.शिराळेखुर्द व कणदूर गावांना लाल मातीतील कुस्तीचा मोठा वारसा आहे. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांची प्रेरणा घेऊन मारुतीराव आंदळकर, बाबुराव पाटील, पांडुरंग पाटील, वस्ताद दत्तात्रय पाटील, महादेव पाटील, ज्ञानदेव सुर्ले, पांडुरंग पाटील, मुरलीधर पाटील, पांडुरंग खाडे असे नामांकित मल्ल घडले, तर दत्तात्रय आंदळकर, जोतीराम पाटील, भरत पाटील, विलास पाटील, भीमराव कदम आदींनी ही कुस्तीची परंपरा जपली. अमोल हा झटपट कुस्तीसाठी प्रसिध्द असून आतापर्यंत त्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे कुस्तीतले अनेक किताब मिळाले आहेत. यशवंत दूध संघाचा तो मानधनधारक मल्ल आहे.हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, सत्यजित नाईक, दत्तात्रय आंदळकर, दीपक पाटील, नितीन शिंदे, वडील नारायण पाटील शिक्षक वर्णे यांचे मार्गदर्शन लाभले.(वार्ताहर)
शिराळ्याच्या तीन मल्लांची रशियातील स्पर्धेसाठी निवड
By admin | Published: January 02, 2015 10:49 PM