सोलापूर : कोरोनाशी लढा देणाºया आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाºया मास्कचा पुरवठा करण्याचे काम करून जिल्ह्यातील ७५० महिलांनी रोजगार संधी साधली आहे.
कोरोनाची साथ सुरू झाल्यावर एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) आयुक्त आर. विमला यांनी राज्यातील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांना मास्क, सॅनिटायझर बनविण्याची संधी उपलब्ध करून दिली. मास्क व सॅनिटायझर कसे बनवायचे याची माहिती राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांना पुरविण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील १८२ महिला बचत गटाने ही संधी साधली व मास्क बनविण्याच्या कामाला सुरुवात केली. तालुक्यातील कापड, दोरा खरेदी करून स्थानिक पातळीवर मास्कची विक्री सुरू करण्यात आली. ग्रामपंचायतींनी बचत गटाचे मास्क खरेदी करून या कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यानंतर आरोग्य विभाग व मेडिकल दुकानातून मागणी वाढत गेली.
त्यानंतर सोलापूर महापालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या बचत गटांना दोन लाख मास्क पुरविण्याची आॅर्डर दिली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटाच्या कामाला बळ दिले. यामुळे गेले दहा दिवस या महिला मास्क बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत. महापालिकेला २५ हजार मास्क पुरविण्यात आले आहेत.
असा मिळाला रोजगार- बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी बाजारात कापड खरेदी केले. त्यानंतर शासनाने दिलेल्या साईजमध्ये कापड कापून मध्ये तीन टप्पे करून शिलाई मशीनवर शिवले जाते. त्याला बंद किंवा रबरी पट्टीचा आधार दिला की झाला तयार मास्क. कापड, दोरा व बंद मिळून सात ते आठ रुपये खर्च आला. बाजारात हे मास्क १६ ते १८ रुपयाला विकले गेले. विक्री किरकोळ असल्याने नफा जास्त होता. पण आता महापालिका, जिल्हा परिषदेने मोठी आॅर्डर दिली आहे. यात १२ रुपये किमतीला एक मास्क विकला जात आहे. तरीही प्रत्येक मास्कमागे ४ रुपये रोजगार मिळत आहे.
भाजीचीही होतेय विक्री- लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची मोठी गरज निर्माण झाली. यात महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी भाजी विक्री करून रोजगार मिळविला. त्याचबरोबर शासनाच्या निवारा केंद्राला मोफत भाजी पुरविली. अक्कलकोट व माळशिरस येथील बचत गटाने सॅनिटायझर उत्पादन करण्याचा प्रयत्न केला पण परवाना व मागणीचे गणित त्यांना जमले नाही.
जिल्ह्यातील महिला बचत गटाने १ लाख ६२ हजार मास्क बनविले. त्यातील १ लाख ५९ हजार मास्कची विक्री केली. यातून १४ लाख १२ हजारांचे उत्पन्न मिळाले. महापालिका व जिल्हा आरोग्य विभागाने आॅर्डर दिल्याने बचत गटातील महिलांना मोठा रोजगार मिळाला आहे.- मीनाक्षी मडीवळी, जिल्हा व्यवस्थापक, उमेद.