सोलापूर : खत दुकानात डमी ग्राहक पाठवून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यानेच स्टिंग ऑपरेशन केले असता जादा दराने खताची विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. आता या मोडनिंबच्या खत दुकानावर काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
त्याचे झाले असे, खरीप पेरणी जवळ आल्याने शिवाय उसाच्या मशागती सुरू झाल्याने सगळीकडून रासायनिक खताची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढल्याने खत दुकानदार याचा फायदा उचलत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्याकडे अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. शिवाय काही खत दुकानाच्या नावानेही तक्रारी आल्या होत्या. सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे हे मोडनिंबमध्ये गेले. तेथे त्यांनी डमी शेतकरी पाठवून युरिया व एस.एस.एन. खताची मागणी केली. युरिया व एस.एस.एन. खताचा एम.आर.पी.पेक्षा अधिक दर सांगितला. एम.आर.पी. व विक्री दरात मोठी तफावत असल्याचे लक्षात आले. आता या दुकानावर रीतसर कारवाई सुरू केली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
मोडनिंब येथील खत दुकानात डमी ग्राहक पाठवून युरिया व इतर खताची चौकशी केली असता अधिक दराने विक्री सुरू असल्याचे लक्षात आले. आता नोटीस काढून सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई होईल. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांनी एम.आर.पी. दराने खत विक्री करावी. अधिक दराने विक्री करताना आढळल्यास कारवाई केली जाईल.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.