मतदान कार्ड विकणे आहे? राष्ट्रवादी फुटल्यानंतर सोशल मिडियावर मिम्सचा धुमाकूळ
By Appasaheb.patil | Published: July 2, 2023 04:02 PM2023-07-02T16:02:02+5:302023-07-02T16:02:36+5:30
राष्ट्रवादी फुटली.. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : राष्ट्रवादी फुटली.. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली अन् अचानक झालेल्या या शपथविधी सोहळ्यामुळं अनेकांची झोप उडाली. मोठा राजकीय भूकंप झाला. पहाटेचा शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीनंतर सोशल मिडियावर मिम्स्, स्टेटस्, पोस्ट व लोकांचा टाईमपास करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात सर्वात जास्त व्हायरल होत असलेली पोस्ट म्हणजे अनेक तरूणांनी मतदान कार्ड विकणे आहे ? हेच आहे.
शपथविधीनंतर सोशल मिडियावर मतदान कार्ड विकणे आहे ? गद्दार शब्दाला राजमान्यता, गद्दार नव्हे खुद्दार. आता कार्तिकीची विठ्ठलाची पूजा कोण करणार फडणवीस की अजित पवार ? गायब असे व्हा नंतर, राजभवनाकडे असे जा की मुख्यमंत्री मागे पळत आले पाहिजेत. गद्दार या शब्दाला समानार्थी शब्द शोधणारा मराठी तज्ञ हवा आहे. राष्ट्रवादी ( शरद गोविंदराव पवार ) गट. घड्याळातील काटे विरुद्ध दिशेने धावू लागले. खाल्लेले खोके बाहेर निघू नये म्हणून हे सुरु आहे. आता किती खोके घेतले म्हणून ओरडणे सुरू होणार. अजित पवार आता पक्ष चिन्हावरून पुन्हा कोर्ट कचेरीचे फेरे घेणार का ? भाकरी फिरविता फिरविता अजित पवारांनी चुलच उचलून नेली अशा एक ना अनेक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.