सोलापूर : तीन अपत्य असल्याच्या कारणावरून सोलापूर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता रामदास मगर यांचे पद रद्द करण्याचा आदेश वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील यांनी शनिवारी दिला.अनिता मगर या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्या प्रभाग ११क मधून निवडूण आल्या होत्या. पराभूत उमेदवार भाजपच्या भाग्यलक्ष्मी प्रकाश म्हंता यांनी तीन अपत्ये असल्याने मगर यांचे पद रद्द करावे, अशी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. सुनावणीवेळेस न्यायालयाने महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची साक्ष नोंदविली. मगर यांनी निवडणुकीवेळी अर्ज भरताना त्यात तीन अपत्ये असल्याचे नोंद केले होते. निवडणुकीसाठी पात्र आहात काय? या कॉलमसमोर त्यांनी पात्र असल्याचे नमूद केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास तपासणीवेळी ही चूक लक्षात आली नसावी. अन्यथा त्याचवेळी त्यांचा अर्ज अपात्र ठरला असता. गडबडीत अशी चूक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले होते.
सेनेच्या अनिता मगर यांचे नगरसेवकपद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 5:17 AM