सोलापूर : एसएमटीच्या बस फेºयाच्या नियोजनात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मुख्य वाहतूक निरीक्षक भरत कंदकुरे आणि कार्यशाळा व्यवस्थापक एम. एस. पडगानूर या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय महापालिका परिवहन समितीच्या सभेत घेण्यात आला.
परिवहन समितीची सभा सभापती गणेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत विजय पुकाळे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. महापालिका परिवहन उपक्रमाकडील बससंख्या कमी होत चालली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना अडचणी येत आहेत. रिक्षातून जादा भाडे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. आता लवकरच शाळा सुरू होणार आहेत. शहरातील नागरिकांना वेळेत व अखंडित सेवा देण्यात वाहतूक व कर्मशाळा विभागात समन्वय दिसून येत नाही. यामुळे परिवहन विभागाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. वाहतूक विभागाचे प्रमुख कंदकुरे यांचे मार्गावर लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. बसची संख्या वाढविण्याची सूचना करूनही कार्यशाळा व्यवस्थापक पडगानूर यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पुकाळे यांनी केली. चर्चेअंती हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
चेसी क्रॅक बसप्रकरणी लवादाने दिलेल्या निकालाविरूद्ध अपील करण्यासाठी अॅड. विजय मराठे यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. लवादाने अशोक लेलँडच्या बाजूने १६ एप्रिल रोजी निकाल दिला. २२ एप्रिल रोजी परिवहन विभागाला निकालाची प्रत मिळाली. या निकालाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी अॅड. मराठे यांचे नाव सुचविण्यात आले. त्यानुसार मराठे यांनी अपील करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करणे व इतर खर्चासाठी १0 लाखांची फी सांगितली आहे.
याबाबत २१ मे रोजी प्रशासनाने परिवहन सभेकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. चर्चेअंती या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी सरकारने मिळविलेल्या यशाबाबत अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.