पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कोविड रुग्ण, दिव्यांग व ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पोस्टाद्वारे मतदान करता येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी यांची बैठक पंढरपूर येथे झाली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकुमार घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, ही निवडणूक कोरोनाच्या कालावधीत होत असल्याने आव्हानात्मक आहे. मात्र याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक यशस्वी करेल. मतदान केंद्रावर कोरोनाबाबत पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य पथक तैनात केले जाणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना कोरोना प्रतिबंधिक लस दिली जाणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ असणार आहे.
वाढलेल्या मतदानकेंद्रावर सूक्ष्म निरीक्षक
निवडणुकीचे कामकाज काटेकोरपणे व्हावे यासाठी सर्व अधिकारी आणि विभागांनी नेमून दिलेले काम करावे. पाच आणि त्या पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी गर्दी होणार नाही ,याची काळजी घ्यावी. तेथे अधिकचा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा. वाढलेल्या मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्ती करावी. तसेच त्यांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही करावी. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जागृतीसाठी अभिनव कल्पनांचा वापर करावा, असेही देशपांडे यांनी सांगितले.
सभांच्या गर्दीसंबंधी ठोस निर्णय नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात होणारे उत्सव व यात्रा रद्द केल्या आहेत. मर्यादित भाविकांना विठ्ठलाचे दर्शन देण्यात येत आहे. मात्र पोटनिवडणुकीत होणाऱ्या सभांमध्ये किती नागरिक उपस्थित राहतील, याविषयी प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नाही, याविषयी विचारल्यास त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असे उत्तर देण्यात आले.
फोटो
१९पंढरपूर-इलेक्शन
ओळी
पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसंबंधी माहिती देताना निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी श्रीकांत देशपांडे, सह मुख्य निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे.
---