सोलापूर : बहुजन समाज पार्टीचे शहर व जिल्ह्यात बीज रोवणारे, कर्मठ आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते राहूल विठ्ठल सरवदे (वय ६५) यांचे बुधवारी सकाळी ७ वाजता निधन झाले. बहुजन समाज पार्टी (बीएसपी) च्या स्थापनेपूर्वी सन १९७८ पासून बामसेफ, डीएसफोर मध्ये काम केले होते. त्यानंतर १९८४ साली स्थापन झालेल्या बहुजन समाज पार्टी मध्ये त्यांनी शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय कमिटीवर, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष, तेलंगणा राज्य प्रभारी, कर्नाटक राज्य प्रभारी, महाराष्ट्र राज्य प्रभारी, केंद्रीय सचिव अशी अनेक पदे त्यांनी हाताळली आहेत. महाराष्ट्रातील कांशीराम यांच्या खाजगी नोंदवही मध्ये नोंद असलेला अत्यंत विश्वासु आणि निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. 'बीएसपी' शी आणि चळवळीशी कधीही फारकत घेणार नाही, अश्या अशयाचे शपथपत्र कांशीराम यांना देणाऱ्या निवडक लोकांतील एक व्यक्ती होते. रोखठोक, प्रभावी आणि परखड भाषण शैलीने विचारांची आगपाखड करणारे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा यांच्या घरापासून बुधवारी २९ मे रोजी सायं. ५.००.वा. निघणार आहे.