रवींद्र देशमुख, सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने यंदाच्या वर्षी मंगळवेढा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेच्यावतीने विभागीय साहित्य संमेलन होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अरुण म्हात्रे यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती विभागीय संमेलनाचे समन्वयक पद्माकर कुलकर्णी आणि मसाप दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दिली आहे.
मंगळवेढा येथे संमेलनाच्या संदर्भात स्वागत अध्यक्ष माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी २ आणि ३ डिसेंबर २०२३ या तारखा संमेलनासाठी निश्चित करण्यात आल्या असल्याची माहितीही देण्यात आली.
मंगळवेढ्याला संत चोखामेळा, संत दामाजी आणि संत कान्होपात्रा यांची साहित्य परंपरा आहे. मंगळवेढ्याच्या संत दामाजी नगरीत हे विभागीय साहित्य संमेलन होत असल्याने शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या संमेलन यशस्वी करुन दाखवणार असल्याचे मोठ्या उत्साहाने सांगितले.या वेळी मसाप दामाजी नगरचे कार्याध्यक्ष दिगंबर भगरे, प्रमुख कार्यवाह माजी प्राचार्य डॉ. सुभाष कदम, कार्यवाह संभाजी सलगर व लहु ढगे, डाॅ.दत्ता सरगर, सचिन गालफाडे, गोरक्ष जाधव, लक्ष्मण नागणे, रेखा जडे, भारती धनवे, सुवर्णा काशिद, अँड.हसिना सुतार, मसाप सोलापुर शाखेचे कार्यवाह राजेंद्र भोसले उपस्थित होते.